लाेणार : रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा एक टिप्पर ‘महसूल’च्या पथकाने २६ मे राेजी पकडला़ याप्रकरणी टिप्परमालकाला २ लाख ६६ हजार रुपयांचा दंड करण्यात आला़ या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़
मराठवाड्यातील वाळू घाटातून रात्रीच्यावेळी अवैधरित्या वाळूची चोरून वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सैफन नदाफ यांनी मिळाली. या माहितीवरून त्यांनी आपल्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून नायब तहसीलदार हेमंत पाटील, तलाठी विजय पोफळे, जगन बारबुदे, राजू भाकडे, भगवानराव मुसळे, वाहनचालक सुभाष गोदमले यांच्या पथकाने रात्रीच्या वेळी शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील आजीसपूर ते देऊळगाव कुंडपाळ पाटीजवळ सापळा रचला. यावेळी (एम. एच. २८ बीबी /१७६७) या क्रमांकाचा टिप्पर चालक अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. यावेळी पथकाने हे टिप्पर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात लावले. वाळूची वाहतूक करणारा टिप्पर हा मेहकर येथील सागर रमेश शेळके यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकरणी तहसीलदार सैफन नदाफ यांनी टिप्परला २ लाख ६६ हजार रुपये दंड आकारात तो वसूलसुद्धा केला.