अंढेरा : खडकपूर्णा नदीच्या घाटातून रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारा टिप्पर अंढेरा पाेलिसांनी जप्त केला़ या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीच्या घाटातून माेठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून वाहतूक सुरू आहे़ रेती घाटावर महसूलच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असली तरीही उत्खनन करून वाहतूक सुरूच आहे़ २६ जूनला सकाळी ठाणेदार राजवंत आठवले हे आपल्या इतर कर्मचाऱ्यांसोबत नाकाबंदी करत असताना देऊळगाव राजाकडून अवैध रेतीने भरलेले विना नंबर प्लेटचे टिप्पर हे चिखलीकडे जात असताना आढळले. पाेलिसांनी अंढेरा फाटा येथे टिप्पर थांबवून राॅयल्टी तसेच परवाना तपासला असता टिप्पर चालक विजय संजय शिंगणे (रा. चिखली) यांच्याकडे रेतीचा परवाना मिळून आला नाही. तसेच वाहनाची कागदपत्रे व वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता मिळून आला नाही. तसेच टिप्पर मालकाचे नाव विचारताच अबरार शकील अतार रा. माळीपुरा चिखली येथील असल्याचे सांगितले. पोलिसांनी टिप्परचा पंचनामा केला असता टिप्परमध्ये तीन ब्रास रेती अंदाजे मिळून आली. या प्रकरणी टिप्पर मालक अबरार शकील अतार व चालक विजय संजय शिंगणे यांच्याविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पाेलीस करीत आहेत़