प्रसूतीसाठी पैसे न दिल्यामुळे चक्क नवजात बाळ न देण्याची धमकी, इतर प्रसूती प्रकरणात पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकाराची गंभीरतेने दखल आमदार महालेंनी घेतली. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबत पत्र देऊन प्रकरणाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत सूचित केले होते. यानुषंगाने २३ डिसेंबर रोजी स्थानिक ग्रामीण रुग्णालया चौकशी समिती दाखल झाली असता आमदार महालेंनी चौकशी समितीची भेट घेऊन दोषींना तातडीने निलंबित करण्याचे निर्देश दिले.
चौकशी समितीचा अहवाल सहसंचालकांना सादर
आ.महाले यांच्या निर्देशानुसार २३ डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयातील प्रकाराची समतीने सखोल चौकशीअंती तयार केलेला अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांनी सहसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविला असून, जिल्हाधिकारी, बुलडाणा यांना प्रत अग्रेषीत केली आहे. सदर चौकशी समितीत डॉ. मकानदार, डॉ. कदम आणि चिखली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. खान यांचा समावेश होता.
कर्मचाऱ्यांना शिस्त लावा
येथील रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. गोरगरीब रुग्णांसोबत अधिकारी, कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली असून, रुग्णांची आर्थिक लूट करून त्यांच्यावर उपचार न करणाऱ्यांना शिस्त लावा, अशी तंबीच तातडीची बैठक घेऊन आ. श्वेता महाले यांनी वैद्यकीय अधिकारी यांना दिली. दवाखान्यातील सर्व वाॅर्डमध्ये फिरून भरती असलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूसदेखील त्यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, नगरसेवक शैलेश बाहेती, गोविंद देव्हडे, सुभाषआप्पा झगडे, नामू गुरुदासानी, दत्ता सुसर उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालय बांधकामाची पाहणी
येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झालेले आहे. त्यानुषंगाने इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचीदेखील पाहणी आमदार महाले यांनी यावेळी केली. दरम्यान ५-६ वर्षांपूर्वी बांधून तयार निवासस्थानांची वापराविना अत्यंत खस्ता हालत झाली असल्याने पाहून रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबाबतही रोष व्यक्त केला. तथापि याबाबत तातडीने बैठक बोलावून निवासस्थानांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनादेखील आ. महाले यांनी यावेळी दिल्या.