लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील मानाच्या मोठ्या देवीला भाविक भक्तांकडून शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातून भव्य विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. शहरातील अनेक मंडळांकडून मिरवणुकीत सहभाग घेण्यात आला.
२३ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या शांती उत्सवाची ३ नोव्हेंबर रोजी सांगता झाली. जलालपुºयातील मोठ्या देवीची विसर्जन मिरवणूक दुपारी १२:३० वा. निघाली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मोठ्या देवीची विसर्जन मिरवणूक गांधी चौकात येताच वंदेमातरम मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी फटाक्यांची आतषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीकरीता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशिल भागातही तगडा पोलीस बंदोबस्त दिसून आला. सजनपुरी, बर्डे प्लॉट, मस्तान चौक आदी भागात शुक्रवारपासून पोलीस तैनात आहेत. मोठ्या देवीची मिरवणूक महावीर चौक, गांधी चौक, मेनरोड, आठवडी बाजार, मच्छी मार्केट, भुसावळ चौक, सतीफैल, बर्डे प्लॉट, शिवाजी नगर, सरकी लाईन, फरशी, शिवाजी वेस, दंडे स्वामी मंदीर, घाटपुरी नाका या मार्गाने निघाली. त्यानंतर मोठ्या देवीचे जनुना तलावात विसर्जन करण्यात आले. त्या अनुषंगाने नगर परिषदेच्या वतीने जनुना तलाव परिसरात साफसफाई करून दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली होती. शहराच्या विविध मार्गावर महिला आणि भाविकांच्यावतीने मोठी देवीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.