लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: लॉकडाउनमुळे मजुरीसाठी स्थलांतरित झालेली अनेक कुटुंबे स्वगृही परत आली. अशा सर्व स्थलांतरित कुटुंबांमधील ३ महिने ते ६ महिने वयोगटातील बालके, ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर आणि स्तनदा माता, पोषण आहार न मिळणारी कॉन्व्हेंट मधील बालके अशा सर्व सुमारे ४ हजार स्थलांतरित लाभार्थ्यांना शासनाकडून लवकरच घरपोच पोषण आहार देण्यात येणार आहे.ग्रामीण पातळीवर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून लाभार्थी संख्यांचे अहवाल तालुकास्तरीय एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडे पाठविण्यात आले आहेत. या सर्वेक्षणानुसार स्थलांतरित सर्व लाभार्थ्यांसाठी पोषण आहार मागणीची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. एप्रिल २०२० च्या सर्वेनुसार ही मागणी असून त्यामध्ये स्थलांतरित लाभार्थ्यांच्या आहाराची मागणी नोंदविण्यात यावी असे आदेश आहेत. स्थलांतरित सर्व लाभार्थ्यांची नोंद शासनाच्या आॅनलाइन घेण्यात यावी. ३ ते ६ वर्षे वयोगटातील ज्यांच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नाही. त्यांचे आई किंवा वडील यांचे आधार कार्ड घेण्यात येणार आहे. ज्या लाभार्थींची आधार नोंदणी झालेली नाही. ते आहारापासून वंचित राहू नये, म्हणून त्यांचे स्थानिक प्राधिकरणाचे जन्मदाखला, राशन कार्ड, माता संगोपन कार्ड, गरोदर स्तनदा मातांची ओळखपत्र इत्यादी पुरावा म्हणून अंगणवाडी सेविकांचा दप्तरी घेतले जाणार आहे. पर्यवेक्षकांनी योग्य ती कार्यवाही करून ११ मेपर्यंत पोषण आहार नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पर्यवेक्षकांनी आपापल्या प्रकल्पातील बीट अंतर्गत अंगणवाडी सेविकांना सूचना देऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे.
स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी लागणाऱ्या पोषण आहाराची मागणी महिला बालकल्याण कक्ष बुलडाणा यांच्याकडे करण्यात आली आहे. माल प्राप्त झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येईल.-सुनिता वानखडेप्रभारी-बालविकास प्रकल्प अधिकारी जळगाव जा.