चिखली : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात पालिका पोलिस व तहसील प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदी आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरसावली आहे. यानुषंगाने १७ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी स्वत: कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरून नागरिकांना सूचना दिल्या. तसेच अनेकांवर दंडात्मक कारवाई केली.
चिखली शहरासह तालुक्यात मागील आठवडाभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे उपाययोजना गरजेच्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यातदेखील कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या आदेशाने २८ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी १७ फेब्रुवारी रोजी तहसील, नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाव्दारे शहरातील डी.पी.रोड, आठवडी बाजार, तहसील व नगरपालिका परिसर, बसस्थानक आदी भागातील सर्व लहानमोठ्या व्यावसायिकांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचित करण्यात आले. तथापि शहरातील सर्व शासकीय, खासगी शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याबाबत संबंधिताना सूचित केले आहे. तहसीलदार अजितकुमार येळे, मुख्याधिकारी वायकोस, नायब तहसीलदार वाळे, न.प.प्रशासन अधिकारी अर्जुनराव इंगळे, अभियंता एस.पी.भालेराव, दिलीप इंगळे, जयेश खरात आदी पालिका, महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत शहरात ठिकठिकाणी दंडात्मक कारवाईस सुरुवातदेखील केली असून २८ फेब्रुवारीपर्यंत शहरात कोठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये यानुषंगाने पालिका कर्मचाऱ्यांची ६ पथके स्थापन करण्यात आली आहेत.
क्रिकेटचे सामने पुढे ढकलले
महाराष्ट्र शिक्षक आघाडी व राजमाता जिजाऊ अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक तालुका क्रीडासंकुलाच्या मैदानावर १६ ते २१ फेब्रुवारी दरम्यान क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाचे संचारबंदीचे आदेश आल्याने शासनयमांचा आदर करण्यासह राजकीय व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून स्पर्धेतील उर्वरित सामने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती या स्पर्धांचे आयोजक प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी दिली आहे.
कोरोनाबाधितांचा विस्फोट होण्यापूर्वी शहरात सर्वत्र आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यासाठी पालिकेची सहा पथके तैनात करण्यात आली असून संभाव्य धोका टाळण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. तथापि नागरिकांनीदेखील सतर्क राहणे गरजेचे आहे.
अभिजित वायकोस, मुख्याधिकारी, न.प.चिखली
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना यापुढे घरी ठेवण्यास परवानगी देण्यात येणार नाही. सर्व बाधितांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच एका पॉझिटिव्ह रुग्णामागे ३५ जणांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत. तातडीने नियंत्रण मिळविण्याच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.
-डॉ. सांगळे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी