देऊळगाव राजा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने १० मेच्या रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. देऊळगाव राजा शहर आणि तालुक्यात या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी १० मेच्या रात्री आठ वाजेपासून कडक निर्बंध लावले आहेत. त्यानुसार महसूल, पोलीस तसेच नगरपालिकेच्या पथकाकडून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरुवात करण्यात आली. मंगळवारी सकाळी दवाखान्याच्या नावाखाली बाहेर पडणाऱ्या नागरिकांना समज देऊन परत पाठवले. यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा माेठ्या प्रमाणात समावेश हाेता. काही तरुण विनाकारण दुचाकीने फिरताना आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही दुकानदार अर्धे शटर उघडून साहित्य विकताना आढळले. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ११ मेच्या पाच वाजेपर्यंत तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. बुलडाणा - जालना सीमेवर आज आरोग्य विभागामार्फत कोरोना संसर्गासंदर्भात रॅपिड टेस्टसुद्धा करण्यात आल्या. परंतु यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच सीमेवर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये काही कारण नसताना जिल्ह्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवण्यात आले. यावेळी पोलीस पथकप्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाखेंसह आर. जी. दांडगे, संजय चवरे इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले हाेते. महसूलच्या पथकामध्ये सारिका भगत यांच्या नेतृत्त्वात एस. राणे. नायब तहसीलदार आर. एन. तागवाले, तलाठी एम. के. झिने कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिका पथकामध्ये पथक प्रमुख सी. पी. तायडे, राजेंद्र गोरे, राजेश अग्रवाल, मनोज अग्रवाल इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून दंडात्मक कारवाईला सामोरे जाऊ नये. बँक सध्या बंद असल्यामुळे घरातूनच ऑनलाईन व्यवहार करावा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. दवाखान्याच्या नावाखाली नागरिकांनी बाहेर पडू नये. ग्रामीण भागातील नागरिकांनीसुद्धा शहराकडे येणे टाळावे.
-प्रमोद भातनाखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा