चिखली : देशाच्या रक्षणार्थ वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणारे सैनिकच या देशाचे खरे शिल्पकार असून त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही, असे प्रतिपादन हिरकणी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. वृषाली बोंद्रे यांनी मेरा बु. येथे केले.
हिरकणी प्रतिष्ठाण व हिरकणी महिला अर्बनच्यावतीने मेरा बु. येथे परिसरातील आजी माजी सैनिकांसह, वीर माता-पिता व वीरपत्नींचा सत्कार २७ ऑगस्ट रोजी करण्यात आला. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे होते. तर जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदकिशोर सवडतकर, अशोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, राकाँ तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, दिलीप सानप, प.स. सदस्या जुलेखाबी सत्तार पटेल, प्रमिला जाधव, सरपंच अनिता वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. शहीद कैलास पवार, जगदीश जोहरे, किशोर काळुसे आदी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी परिसरातील आजी-माजी सैनिकांसह वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला बाजार समिती प्रशासक गजानन परिहार, गुंजाळा सरपंच दीपक केसकर, अंत्रीखेडेकर सरपंच सचिन खेडेकर, कलिमखॉ पठाण, ज्ञानेश्वर पडघान, दिनकर डोंगरदीवे, बाबुलाल जोहरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन निलकुमार बंगाळे तर आभार सागर कुरकुटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी हिरकणी महिला अर्बनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सैनिकांच्या कुटुंबीयांची आर्थिक प्रगती गरजेची : राहुल बोंद्रे
कुटुंब वाऱ्यावर सोडून देश रक्षणार्थ प्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचे व त्यांनी देशवासीयांसाठी दिलेल्या बलिदानाचे मोल होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक प्रगती होण्याबरोबरच सामाजिक प्रगतीही होणे गरजेचे आहे, असे मत यावेळी राहुल बोंद्रे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.