संग्रामपूर (बुलढाणा) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ देशी कट्टे, १७ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याने घातक हत्यारांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सायंकाळी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात घातक हत्यारांची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींच्या मुसक्या सोनाळा पोलिसांनी आवळल्या असून, एक फरार झाला आहे. या कारवाईने सोनाळा पोलीस हद्दीतील आदिवासी पट्ट्यात एकच खळबळ उडाली.
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी ते वसाडी रोडवरील निमखेडी फाट्याजवळ वसाली शिवारात पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत ४ मॅक्झिनसह ४ स्टील देशी बनावटीचे पिस्तूल व १७ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी भारसिंग मिसऱ्या खिराडे (२२), हिरचंद गुमानसिंग उचवारे (२४), दोन्ही रा. पाचोरी, ता. खकणार, जि. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) देशी कट्टे घेऊन आले. त्यांच्याकडून देशी पिस्तूल व काडतुसे खरेदी करण्यासाठी आकाश मुरलीधर मेश्राम (३५), रा. करुणानगर, बालाघाट, मध्य प्रदेश, संदीप अतराम डोंगरे (३२), रा. आमगाव रोशना, ता. बालाघाट, नयनसिंग पटवा, रा. पाचोरी, ता. खकनार हे तिघे आले होते. वसाली शिवारात ठरल्याप्रमाणे व्यवहार सुरू होते.
सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांना याबाबत माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे सोनाळा पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालासह चार आरोपींना अटक केली. यातील नयनसिंग पटवा, रा. पाचोरी, ता. खकनार, जि. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) हा आरोपी फरार झाला. पोलिसांनी या कारवाईत नगदी ३२ हजार ३७० रुपयांसह एकूण २ लाख १७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात कलम ३, २५ शस्त्र अधिनियम १९५९ सहकलम १३५ मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर घातक हत्यारांच्या तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले. या कारवाया संग्रामपूर, जळगाव, जा. तालुक्यालगत असलेल्या मध्य प्रदेशच्या सीमेवरून जंगलाच्या मार्गाने होत आहेत. मध्य प्रदेशातील पाचोरी हे घातक हत्यारांच्या तस्करीचे केंद्र बनले आहे. या गोरखधंद्यातील मुख्य मास्टरमाइंडला जेरबंद करण्याचे आव्हान बुलढाणा जिल्हा पोलिस दलासमोर उभे ठाकले आहे.
सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीतील माहितीच्या आधारे सापळा रचून मध्य प्रदेशातील आरोपींना मुद्देमालासह रंगेहात पकडले. ४ आरोपींना अटक करण्यात आली. एक आरोपी फरार झाला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. - चंद्रकांत पाटील, ठाणेदार, सोनाळा