दिनेश पठाडे, बुलढाणा : सन २०२४ च्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चना डाळ, साखर व १ लिटर सोयाबीन तेल या शिधाजिन्नसांचा समावेश असलेला 'आनंदाचा शिधा' प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने शुक्रवारी घेतला आहे.
राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ होणे अपेक्षित आहे. सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात सणसुदीच्या काळात आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे. यापूर्वीदेखील विविध सणवार, जयंती समारंभानिमित्त रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांत प्रतिसंच शिधा वितरित करण्यात आला. त्यास लाभार्थींचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर आगामी गौरी-गणपती उत्सवातदेखील आनंदाचा शिधा उपलब्ध केला जाणार आहे.
जिल्ह्याला आनंदाचा शिधा वितरित करण्याकरिता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांऐवजी ८ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
१५ ऑगस्टपासून होणार वाटप सुरू-
गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी चार शिधाजिन्नस असलेला आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संज १५ ऑगस्टपासून वाटप करण्यास सुरू होणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत त्याचे वितरण केले जाईल. या १ महिन्याच्या कालावधीत ई-पॉसप्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसंच शिधा दिला जाईल.
५६२.५१ कोटी निधीस मान्यता-
प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संचांची खरेदी करण्याकरिता परिगणित केलेल्या अंदाजित किमतीनुसार व इतर आनुषंगिक खर्चासह एकूण ५६२.५१ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.