अनिल गवई,खामगाव : स्थानिक वैद्यकीय व्यावयायिकाच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाशी साम्य असलेला धक्कादायक प्रकार दाबण्यात आल्याचे आता पुढे येत आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावले असून, अल्पवयीन मुलगा असल्याने त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यानेच हा सर्व खटाटोप करण्यात आल्याचा दावा सूत्रांचा आहे. यासाठी शहरातील काही युवा राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीतून मोठी रसद पुरविण्यात आल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, प्रकरण निस्तरण्याच्या हालचालींसाठी वेळ देण्यात आला. राजकीय हस्तक्षेपातून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच बदललेला आरोपी सुटावा, यासाठी कायदेशीर तोडग्यावरही चर्चा करण्यात आली. त्यातून गुन्हा अंगावर घेणाऱ्या माथणी येथील चालकाची सुटका व्हावी म्हणून मृतकाच्या रक्त नमुन्यात बदल अथवा मद्य मिसळण्याचे प्रयत्न झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आरोपीच्या नातेवाइकांमुळे फुटले बिंग-
आरोपी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांच्या नजीकच्या एका नातेवाइकांमुळेच हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याची जोरदार चर्चा आता पोलिस वर्तुळात होत आहे. सुरुवातीला प्रकरण निस्तरण्यासाठी आणि त्यानंतर चव्हाट्यावर आणण्यासाठी एका नातेवाईकांच्या वागणुकीमुळेच या प्रकरणाचा बोभाटा झाला आणि पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
मुलावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली-
याप्रकरणी चौकशीअंती सत्य उघडकीस आल्याने पोलीस प्रशासनाची बदनामी होत आहे. परिणामी, आता पोलीस प्रशासनाकडून अपघात घडवून आणणाऱ्या अल्पवयीन मुलाला आरोपी करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. पोलिसांच्या हालचालीमुळे अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे हे प्रकरण असल्याने वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची इत्थंभूत माहिती घेतली जात आहे.
मोठा आर्थिक व्यवहार-
खामगावातील एका धनाढ्य परिवाराशी निगडित प्रकरण निस्तरण्यासाठी खामगावातील दोन युवा राजकीय पुढाऱ्यांसह ग्रामीण भागातील एका स्थानिक लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला. यासाठी संबंधितांना मोठी रसद पुरविण्यात आली. चार ठिकाणी या पैशांची व्यवस्थित वाटणी झाली. त्यामुळे हे प्रकरण बाहेर येणार नाही, असा विश्वास असतानाच गत आठ दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा सर्वदूर पसरली.
प्रतिक्रिया-
खामगाव-शेगाव रोडवरील अपघात प्रकरणी विस्तृत माहिती आपल्या स्तरावरून घेतली जाईल. तसेच हालचाली आणि घडामोडी पाहून पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल. - सुनील कडासणे, जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलढाणा