ब्रह्मानंद जाधव, मोताळा (बुलढाणा) : जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनात झालेल्या लाठीमाराचे पडसाद मोताळ्यात ३ सप्टेंबर रोजी उमटले. या घटनेच्या निषेधार्थ मोताळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोताळा कार्याध्यक्ष सुनील कोल्हे व माजी उपसभापती रावसाहेब देशमुख यांनी अंगावर पेट्रोल घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शांततामय आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या पोलिसी अन्यायाविरोधात रविवारी मोताळ्यात महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह मराठा समाजबांधवानी घोषणाबाजी दिली. दरम्यान, पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. परंतू रास्ता रोको दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मोताळा कार्याध्यक्ष सुनील कोल्हे व माजी उपसभापती रावसाहेब देशमुख यांनी अंगावर पेट्रोल घेतल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. सुरूवातीला त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मोताळा पोलिस स्टेशनला नेण्यात आली.