शेगाव (बुलढाणा) - शेतरस्त्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप करत तालुक्यातील जलंब येथील एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयातील प्रभारी नायब तहसीलदार यांच्या कक्षातच विषारी औषध प्राशन केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
शेगाव तालुक्यातील जलंब येथील शेतकरी अशोक सुपडा सुलताने (वय ४०) यांनी शेतरस्त्यासाठी दोन वर्षांपूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव येथे प्रकरण दाखल केले होते. मात्र, रेकॉर्डवर रस्ताच उपलब्ध नसल्याने ते खारिज झाले होते. त्यांनी या प्रकरणी पुन्हा तहसील कार्यालय शेगाव येथे अर्ज दाखल केला.
शेतरस्त्याच्या मागणीसाठी नायब तहसीलदार पी. जे. पवार यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप करीत त्यांच्याच कक्षातच सुलताने यांनी विषारी औषध प्राशन केले. विष प्राशनाने शेतकरी अत्यवस्थ झाला. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात एकच तारांबळ उडाली. तत्काळ सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात सुलताने यांना उपचारार्थ दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे पाठवण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी शेतरस्त्याचे प्रकरण खारिज झाले होते. नव्याने अर्ज करण्यास त्या शेतकऱ्यास सांगितले होते.
- समाधान सोनोवणे, तहसीलदार, शेगाव.