बुलढाणा: शहरासह धामणगाव बढे येथून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या दोन खासगी प्रवाशी बस पैकी एका बसला मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस नजीक अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. दरम्यान समय सुचकता राखत यात्रेकरू बसमधून बाहेर पडल्याने सुखरूप बचावले. त्यामुळे ‘समृद्धी’वरील गतवर्षीच्या अपघाताची मध्यप्रदेशमध्ये होणारी पुनर्रावृत्ती टळली.
ही घटना मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात कोलारस पोलिस टाण्याच्या हद्दीत बैरसिया क्रॉसिंगनजीक १७ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.बुलढाणा येथून दोन बसद्वारे ६० यात्रेकरून केदारनाथ यात्रेसाठी १५ मे रोजी निघाले होते. एका बसमध्ये धामणगाव बढे येथील तर आग लागलेल्या बसमध्ये बुलढाणा येथील यात्रेकरू होते. मध्यप्रदेशातील कोलारस दरम्यान बसमधून धुर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने चालक व सहाय्यकांनी तथा ही बाब निदर्शनास आलेल्या काही सह यात्रेकरूनी एकमेकास सहकार्य करत बसमधून तातडीने खाली उतरण्यास प्रारंभ केला. बसमधील सर्वच्या सर्व ३० प्रवाशी सुखरुपपणे उतरण्यात यशस्वी झाल्याचे यात्रेकरून पैकी एकाचे नातेवाईक असलेल्या उल्लास बढे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यात १८ महिला व १२ पुरुषांचा समावेश होता. दरम्यान बसने चांगलीच आग पकडली होती. कोलारस पालिकेच्या अग्निश्यामक दलाने नंतर ही आग विझवली. परंतू यामध्ये एमएच-०४-जीपी-०१४४ क्रमांकाची ही बस पुर्णत: जळून खाक झाली आहे. बसच्या एसीमध्ये शॉर्टसर्कीट होऊन ही आग लागल्याची चर्चा यात्रेकरूनपैकी एकाने बोलून दाखवली आहे.
--यात्रेकरूनची मंगल कार्यालयात व्यवस्था--या अपघातामुळे घाबरलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व यात्रेकरूंची कोलारस परिसरात एका मंगल कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींनी यात्रेकरूंना धीर दिला आहे. दरम्यान हे सर्व यात्रेकरू आता त्यांची यात्रा अर्धवट सोडून परत जिल्ह्यात येत आहे. हे सर्व भाविक आता १८ मे रोजी गावी परत येणार आहे.