खामगाव : तालुक्यातील निपाणा येथील एका युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी. कुळकर्णी यांनी गुरुवारी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.
याबाबत पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निपाणा येथील नारायण वासुदेव अंभोरे (६४) या वृद्धाने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील वीज मीटरवरून आरोपी पद्माकर शालिग्राम अंभाेरे (३२) हा गत सहा महिन्यांपासून वीज जोडणीची मागणी करीत होता. मात्र, तक्रारदार स्वत: आणि त्यांचा मुलगा मृतक पांडुरंग नारायण अंभोरे यांच्याकडून या गोष्टीला नकार होता. त्यामुळे आरोपी द्वेषभावनेतून सतत वाद करीत होता. दरम्यान, १५ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी पांडुरंग नारायण अंभोरे व रामभाऊ शंकर अंभोरे दोघे भागवत सप्ताहातील जेवण करून नारायण दत्तात्रेय अंभोरे यांच्या चहाच्या टपरीवर बसले होते. तिथे आरोपी पद्माकर शालिग्राम अंभोरे (३२) हा आला. त्याने वाद घातला. त्यामुळे पांडुरंग अंभोरे उठून जात असताना आरोपीने पाठलाग करीत पांडुरंग अंभोरे याच्यावर चाकूने हल्ला चढविला. यात पांडुरंग अंभोरे गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी पांडुरंगला मृत घोषित केल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध झाल्याने पद्माकर शालिग्राम अंभोरे याला आजन्म कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून २० हजार रुपये तक्रारकर्ता नारायण अंभोरे यांना देण्याचा आदेश दिला. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. रजनी बावस्कर भालेराव यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी राजू परदेशी यांनी केली. दरम्यान, मृतकाच्या वारसांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून मदतीसाठी जिल्हा विधि सेवा समितीकडे जिल्हा न्यायालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला.
यांच्या साक्ष ठरल्या महत्त्वाच्यागुन्हा सिद्ध करताना न्यायालयाने नऊ जणांची साक्ष नोंदविली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन, पंच सय्यद मुबाशिर सय्यद हादी, एपीआय योगेश धोत्रे, एपीआय सचिन लक्ष्मण चव्हाण यांची साक्ष महत्त्वाची ठरली.