- अनिल गवईखामगाव - संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव रविवारी खामगावात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सराफा येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर या शोभायात्रेचा देवजी खिमजी मंगल कार्यालयात तर दुस-या शोभायात्रेचा घाटपुरी नाका येथे समारोप झाला.
श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर आणि सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित शोभायात्रेत मातृशक्तीचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भगवान महाविरांच्या शांततेचे संदेश असलेले विविध फलक हातात घेत, तरूणी आणि मातृशक्तीने शोभायात्रेत जनजागृती केली. या शोभायात्रेत भगवान महावीर यांची आकर्षक मूर्ती असलेला चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचवेळी बैलगाडीतून भगवान महाविरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सराफा येथील जैन मंदिरातून सुरू झालेली शोभायात्रा फरशी, मेनरोड, महावीर चौक, अकोला बाजार, गांधी चौक, अग्रेसन चौकमार्गे देवजी खिमजी मंगल कार्यालयात पोहोचली. महावीर चौकात शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. अग्रसेन चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्यावतीने शोभायात्रेचे स्वागत झाले.यावेळी थंडपाण्याचेही वितरण झाले. शहर पोलीस स्टेशन समोरील गांधी बागेनजीक असलेल्या किर्ती स्तंभाला शोभायात्रेत सहभागी असलेल्या जैन समाज बांधवांनी वंदन केले. मातृशक्तीने किर्तीस्तंभाचे पूजन केले. यावेळी युवती आणि तरूणींनी भक्तीगीतावर सामुहिक नृत्य सादर केले. त्यानंतर बालाजी प्लॉट मार्गे अरजन खिमजी मंगल कार्यालयात शोभायात्रेचा समारोप झाला. तर दुसरी शोभायात्रा प्रमुख मार्गाने घाटपुरी नाका भागात पोहोचल्यानंतर समारोप झाला.
शोभायात्रेतील सहभागींचे स्वागतसकल जैन समाज, जैन समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महावीर चौकात यात्रेवर पृष्पवृष्टी करण्यात आली. अकोला बाजारात थंड पेय, चहा, सरबताचे वितरण करून शोभायात्रेचे स्वागत झाले.