बुलढाणा : बुलढाणा - खामगाव रस्त्याला पहिल्याच पावसात भगदाड पडल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे खामगाव ते बुलढाणा रस्ता हा वरणा फाटा ते दिवठाणा फाट्यापर्यंत धोकादायक बनला आहे. मात्र, त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. या भगदाडामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता आहे.
खामगाव तालुका आणि परिसरात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. रस्ता तयार झाल्यानंतर पहिल्याच पावसात या रस्त्याला काही ठिकाणी खामगाव - बुलढाणा मार्गाला तडे गेले आहेत. तर वर्णा फाट्यावरील संत गजानन महाराज मंदिरापासून दिवठाणा फाट्यापर्यतच्या रस्त्या खालील मलबा, मुरूम वाहून गेला. या काठाहून त्या काठापर्यंत आरपार छिद्र पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचवेळी रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्नही सामान्यांकडून उपस्थित केल्या जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षखामगाव -बुलढाणा रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे या काठाहून त्याकाठापर्यंत छिद्र पडले. केवळ वरचा डांबराचा पापुद्रा शिल्लक असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आली. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत या ठिकाणी कुणीही पोहोचलेले नव्हते. रस्ता बांधकाम करणार्या कंत्राटदाराला वेळोवेळी पाठीशी घालण्यात आले. रस्त्याच्या कडा भरताना मुरूमाऐवजी मातीचा वापर करण्यात आल्यानेच या रस्त्याचा भराव वाहून गेल्याचीही चर्चा या ठिकाणी आता रंगत आहे.