बुलढाणा : कुठल्या स्वर्गरथात असेल माझं लेकरू, मला एकदा तरी बघू द्या... अशा किंकाळ्या, आक्रोशाने अपघाताच्या दुसऱ्या दिवशीही बुलढाणा हादरला. समृद्धी महामार्गावरील १ जुलैला झालेल्या अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी २४ जणांच्या पार्थीवाचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवासही मन हेलावणारा होता.
समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा नजीक झालेल्या खासगी बसच्या अपघातात २५ जणांचा कोळसा झाला. १ जुलैला पहाटे सर्व मृतदेह एकूण सात रुग्णवाहिकेने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतू कोणाचा मृतदेह कोणता हे ओळखणे सुद्धा अवघड. त्यामुळे प्रशासनाची परीक्षा सुरू झाला आहे. नातेवाईकांना मृतदेह कसे द्यायचे, अंत्यसंस्कार कसे करायचे हा मोठा प्रश्न प्रशासनासमाेर होता. अखेर सर्व पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. १ जुलैला दुपारपासूनच मृतकांच्या नातेवाईकांनी बुलढाणा गाठण्यास सुरूवात केली. दिवसभर नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.
२ जुलैला पहाटेपासूनच अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. नातेवाईकांनीही सामान्य रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती. जिकडे तिकडे किंकाळ्या अन् रडणेच एकायला येत होते. सकाळी आठ वाजताच शहरातील सर्व स्वर्गरथ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. १० वाजेपासून स्वर्गरथामध्ये सर्व मृतदेह ठेवण्याला सुरूवात झाली. ११ वाजेपर्यंत सर्व मृतदेह स्वर्गरथामध्ये ठेवण्यात आले. नंतर नातेवाईकांचा टाहो आणखी वाढला. स्वर्गरथामध्ये शव ठेवत असताना नातेवाईकांचा टाहो आणखी वाढला होता. नातेवाईकांनाही आपला व्यक्त कोणत्या स्वर्गरथात आहे, याची कल्पनाही करणे अवघड होते. त्यानंतर ११:१५ वाजता सुरू झाला पार्थीवाचा स्मशानभूमीकडचा प्रवास.
स्वर्गरथामागे आईची धाव...जिल्हा सामान्य रुग्णालयातून स्मशानभूमीमध्ये शव नेण्यासाठी सर्व शव स्वर्गरथात ठेवण्यात आले. स्वर्गरथ शव घेऊन रुग्णालयाच्या बाहेर पडत असताना एका आईने आक्रोश करत त्या स्वर्गरथामागेच धाव घेतली. काही अंतरावर जाऊन ती आई कोसळली. त्या मागे बाबाही यात माझाला मुलगा आहे का हो... असे म्हणून स्वर्गरथामागे धाव घेतात... मन हेलावणारे हे हृदयद्रावक दृश्य होते.
स्मशानापर्यंतचा हा प्रवास
२ जुलै रोजी सकाळी ११:१५ वाजता २४ मृतदेहांचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. चार स्वर्गरथांमधून हे शव बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून त्रिशरण चौकातील स्मशानभूमीमध्ये नेण्यात आले. एकाचवेळी सर्व शव चिखलीरोडने जात असताना संपूर्ण वातावरण गंभीर झाले होते. प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत या मृतकांना अखेरचा निरोप देत होतं.