- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात आवळ्याला चांगला भाव मिळत असताना, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी मात्र आवळ्याच्या बागा काढून टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. आवळ्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे नसल्याने ऐन तेजीतही आवळाउत्पादक शेतकरी सध्या मेटाकूटीस आल्याचे चित्र आहे.बुलडाणा जिल्ह्यात पुर्वी अनेक शेतकरी आवळा उत्पादनाकडे वळले होते. अलीकडे ही संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहीली आहे. असे असले, तरी बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात पळशी घाट, पिंपळगाव काळे, दादुलगाव, आडोळ, जामोद सुनगाव, काकणवाडा येथे अनेक शेतकºयांच्या शेतात आवळ्याच्या बागा आहेत. खामगाव तालुक्यात गारडगाव ते हिवरखेडदरम्यान काही शेतकºयांनी आवळ्याची बाग लावली आहे. घाटावर चिखली, देऊळगावराजा तालुक्यातही अनेक शेतकरी आवळ्याचे उत्पादन घेतात. मात्र याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आवळ्याचे उत्पादन ७० टक्क्यांनी घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे आवळ्याला बाजारात चांगली मागणी आहे. याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना होताना दिसतोय. सध्या तिकडे आवळ्याचा हंगाम सुरू असून घाऊक फळ बाजारात आवळ्याला प्रतिकिलो २५ ते ४० रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात हाच भाव ६० ते ८० रुपये प्रतिकिलो आहे. उत्पादन बुलडाणा जिल्ह्यातही घटले असले, तरी इकडे आवळ्याला घेवाल नसल्याने आवळ्याची बाग नकोच, असे म्हणण्याची वेळी शेतकºयांवर आली आहे. घाटाखालील जळगाव संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी नांदुरा येथे हर्रासीत आवळा विकतात. येथे हर्रासीत आवळ्याला केवळ १० ते १२ रूपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने आवळ्याची तोडणी तसेच वाहतूक खर्चही निघत नसल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आवळ्याचा हंगाम सुरू राहतो. आपल्याकडे कृष्णा जातीच्या आवळ्याची लागवड केली जाते.
आहेत, त्या बागा नष्ट करण्याकडे कल!आवळ्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे शेतकºयांना चांगला फायदा होऊ शकतो. परंतु यासाठी प्रक्रियाउद्योग असणे आवश्यक आहे. आवळ्यापासून कँडी, च्यवनप्राश, आवळा अर्क तयार केला जातो. पश्चिम महाराष्ट्रात असे उद्योग असल्याने त्या भागातील शेतकरी आवळाउत्पादनाकडे वळत आहेत. परंतु आपल्याकडे प्रक्रिया उद्योग नाहीत, पर्यायाने आवळ्याला मागणीही नाही. यामुळे विनाकारण क्षेत्रफळ वाया घालवण्यापेक्षा आवळ्याची झाडे तोडून टाकण्याच्या मन:स्थितीत शेतकरी आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून शेतात आवळ्याची झाडे आहेत. सध्या दोन एकरावर आवळ्याची बाग आहे. उत्पादन कितीही झाले झाले तरी भाव मिळत नाही. त्यामुळे आवळ्याची बाग काढून टाकण्याचा विचार आहे.- रामराव घाईट,शेतकरी, पळशीघाट ता.जळगाव जामोद
आपल्याकडे आवळ्याचे उत्पादन जास्त नाही; परंतु अनेक शेतकरी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आवळा लागवडीचा प्रयोग करत आहेत. यावर्षी उत्पादन घटल्याने भाव चांगला मिळण्याची शक्यता होती. परंतु बाजारपेठेचा अभाव आहे.शशांक दाते,फळबाग लागवड तज्ञकृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद