बुलडाणा : शिक्षण संपल्यानंतर आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात स्थिरावला आहे. कामाचा व्याप वाढल्याने फारसा वेळ मिळत नाही. मात्र जुन्या मित्रांच्या आठवणी अजुनही ताज्या आहेत. माजी विद्यार्थी संमेलनामुळे शाळेतील जुने दिवस आठवले असे प्रतिपादन अभिनेते तथा नाट्य कलावंत गिरीश ओक यांनी शनिवारी येथे केले. येथील एडेड हायस्कूलच्या माजी विद्यार्थी महासंमेलनाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे बुलडाणा विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे होते. स्वागताध्यक्ष राधेश्याम चांडक, संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, उपाध्यक्ष बाबासाहेब महाजन, सचिव अॅड. कविमंडन, मुख्याध्यापक आर. ओ. पाटील, श्रीकांत देशपांडे यांच्यासह शाळेचे माजी शिक्षक उपस्थित होते. गिरीश ओक पुढे म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेतील दिवस महत्वाचे असतात. शाळेतील संस्कारामुळे आयुष्याची जडणघडण होते. नाशिक येथील शाळेत शिकतांना संस्काराची शिदोरी मिळाली. त्यामुळे अभिनय, नाट्य क्षेत्रात यशस्वी झालो. आज नाशिक येथील आपल्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाली असताना आपण शाळेच्या समितीवर असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील जुने मित्र, जुन्या आठवणी, शिक्षकांचा खाल्लेला मार याबाबतचे वेगवेगळे अनुभव ओक यांनी यावेळी सांगितले. बुलडाणा अर्बनचे संस्थापक तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष राधेश्याम चांडक म्हणाले की, शाळेत शिकत असताना आपण सामान्य विद्यार्थी होतो. दहावी पास झाल्यानंतर जिजामाता महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी अर्थशास्त्र विषयात नापास झालो. परंतू दोनच वर्षांनंतर महाविद्यालयात आयोजित अर्थशास्त्र विषयाच्या परिषदेचे उदघाटन आपल्या हस्ते झाले. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता व वास्तव जीवनाचा फारसा संबंध नसतो. माजी विद्यार्थी संमेलनाच्या निमित्ताने आपण समविचारी एकत्र जमलो असून हे सहकाराचे लक्षण आहे. यामधून नक्कीच सकारात्मक बाब घडेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानावरुन बोलताना योगेंद्र गोडे यांनी माजी विद्यार्थी संमेलन आयोजनाच्या भूमिकेचे स्वागत केले. शिक्षकांनी आपल्यावर केलेल्या संस्कारामुळेच जीवनात यशस्वी होता आल्याचे सांगत त्यांनी शाळेत शिकत असतानाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. इतरही मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संचालन अंजली परांजपे यांनी केले.
'एडेड' हायस्कूलच्या दोन दिवसीय माजी विद्यार्थी संमेलनाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 4:25 PM