दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
धामणगाव बढे : मोताळा तालुक्यामध्ये दि. ६ आणि ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांसह महावितरण कंपनीलाही बसला आहे. नदीकाठावरील सुमारे ५० खांब पुरासोबत वाहून गेले. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे विद्युत खांब व तारांची मोठी हानी झाल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यास विलंब होत आहे.
महावितरण कंपनीची संपूर्ण यंत्रणा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती महावितरणचे अभियंता विवेक वाघ यांनी दिली. या घटनेला तिसरा दिवस उजाडूनही किन्होळा सबस्टेशन अंतर्गत येणारी गावे अद्यापही अंधारातच आहेत. दि. ६ व ७ सप्टेंबर रोजी मोताळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यादरम्यान नद्यांना मोठा पूर आला, यामध्ये मोहेगाव, रोहिणखेड, वडगाव, बोराखेडी, पुनई येथील नदीकाठावरील वीज वहन करणारे खांब तारांसह वाहून गेले तर काही चिखलामध्ये दबले.
त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा पूर्णत: खंडित झाला होता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नरत असून, काही भागात वीज पुरवठा सुरू झाला आहे. गावठाणचा वीज पुरवठा सुरू केल्यानंतर शेतामधील वीज पुरवठा करणारी विद्युत लाईन सुरळीत केली जाईल, अशी माहिती महावितरण कंपनीचे अभियंता विवेक वाघ यांनी दिली. मुसळधार पावसानंतर मोताळा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पोफळी परिसरात शेलगाव बाजार येथून वीज पुरवठा जोडण्यात आला तर किन्होळा सबस्टेशन अंतर्गत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू आहे. धामणगाव बढे परिसरातील गावांचा विद्युत पुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.