- निलेश जोशी
बुलडाणा : ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे नागरिकांचे स्थलांतर पाहता जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेत दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११ गावांचा विकास केंद्र योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. आगामी २० वर्षाच्या कालावधीमधील तेथील वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन ही विकास केंद्र योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या ११ गावातील झोन प्लॅन नुसार रहिवास क्षेत्र आणि रस्ते तयार करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक नियोजन मंडळातील सुत्रांनी दिली. विकास शुल्क आणि शासनाकडून प्राप्त निधीतून या गावांमधील रस्ते विकास करण्यात येणार आहे. प्रामुख्याने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्रशासनाकडूनही यात सक्रीय भूमिका निभावल्या जाण्याची शक्यता आहे. सोबतच या गावामध्ये पायाभूत सुविधा देण्यासोबतच स्थानिक पातळीवरच नागरिकांच्या गरजा पूर्ण कशा होतील, हा दृष्टीकोणही समोर ठेवण्यात आला आहे. पुणे येथील एमआर सॅकच्या माध्यमातून या ठिकाणचे नकाशे विकसीत करून त्याचे सविस्तर आरेखन करण्यात आले असल्याची सुत्रांनी दिली. उपविकास केंद्र असेही या योजनेला संबोधण्यात आले आहे. शैक्षणिक, आर्थिक, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, बँकींक सुविधांचाही यामध्ये विचार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने या ११ गावांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तांत्रिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, टपाल कार्यालय, बाजार समिती किंवा उपबाजार समिती, पोलिस चौकी किंवा पोलिस स्टेशन उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. या व्यतिरिक्त व्यापारी तथा सहकारी बँकेची शाखा स्थापण्यासोबच अन्य काही नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने येत्या काळात प्रयत्न होणार आहे. दरम्यान, या पैकी काही सुविधा वर्तमान स्थितीत अशा गावांच्या ठिकाणी उपलब्ध असल्यास तेथील विस्तार तथा त्या सेवांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत.
विकास केंद्रांतर्गत या गावांचा समावेश
प्रादेशिक योजनेतंर्गत येत असलेल्या विकास केंद्र उपक्रमातंर्गत बुडाणा जिल्ह्यातील धाड, देऊळघाट, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, संग्रापूर तालुक्यातील सोनाळा, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे, नांदुरा तालुक्यातील वडनेर, मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, चिखली तालुक्यातील अमडापूर, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही, मेहकर तालुक्यातील डोणगाव, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा या गावांचा समावेश करण्यात आला आहे.