लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली तूर सध्या बाजार समितीत विक्रीला येत असून, आवक वाढताच भावात घसरण झाली आहे. शनिवारी तुरीला ६२५० रूपये प्रतिक्विंटल भाव होते तर सोमवारी यामध्ये दोनशे रूपयांनी घट झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तुरीची पेरणी केल्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे तुरीचे पीक बहरले होते. मात्र त्यानंतर परतीचा जोरदार पाऊस झाला. तसेच परतीचा पाऊस संततधार झाला. त्यामुळे कपाशीचे बोंडे सडली. त्यानंतर बोंडअळीच्या आक्रमणामुळेही कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता तुरीचे पीक बाजार येण्याला सुरूवात झाली आहे. मात्र, जसजशी आवक वाढत आहे, तसे भावात घसरण होत आहे. तुरीच्या दरात गत दोन दिवसात २०० रूपयांनी घसरण झाली आहे. शनिवारी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ६२५० रूपये भाव मिळाला होता. तर सोमवारी यामध्ये घसरण होऊन ६१०० ते ५८०० रूपये भाव मिळाला. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ७ हजार ५६९ क्विंटल तुरीची आवक झाली. तुरीची सोंगणी सुरू असून, बाजार समितीत आवक वाढत आहे. शासनाने तुरीला ६ हजार रूपये हमीभाव जाहीर केला आहे. बाजार समितीत यापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे.
आवक वाढताच तुरीच्या भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 12:06 IST