बुलडाणा : पेट्रोलसह डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिझेलचे दर वाढल्याने किराणा वस्तूंचे दरही वाढत चालले आहेत. वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी किराणा महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत असून, गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मजूर, कामगारांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शासनाने मदत केली असली तरी, अजून हाती पडली नाही. एकीकडे सर्वसामान्य त्रस्त असताना, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा अप्रत्यक्ष फटकाही सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. डिझेलचे दर वाढल्याने मालाच्या वाहतुकीचे दरही वाढले आहेत. परिणामी, किराणा साहित्याचे दरही वाढत आहेत. मागील वर्षभरापासून किराणा वस्तूंच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जून २०२० मध्ये डिझेलचे दर प्रतिलिटर ७२.२३ विक्री होत होते. ते आता ८८ रुपये ७५ पैसे प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. वाहतुकीच्या खर्चामुळे किराणा वस्तूंचे दर वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरम्यान, सध्या कोरोनामुळे काही निर्बंध घालण्यात आले आहेत, याचा फायदा किराणा व्यापारी उठवित आहेत.
काय म्हणतात गृहिणी...?
गॅस सिलिंडरचे दरही वाढले असून, खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यात किराणामालाचे व इतर वस्तूंचे दरही वाढत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांनी कसे जगावे?
- वनिता झनके,गृहिणी
कोरोनाकाळात सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यात गॅस सिलिंडरचे दरही महागले आहेत. आता किराणा वस्तूही महागल्याने घर कसे चालवावे, शासनाने वाढती महागाई कमी करावी.
- भारती इंगळे , गृहिणी
डिझेल दरवाढीमुळे वाहनमालकांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे किराणा वस्तूंचा वाहतूक खर्च वाढला आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत.
श्रीकांत काळवाघे, किराणा व्यापारी
तेल मार्च २०२० सप्टें.२०२० मे २०२१
शेंगदाणा १४५ १७० १८०
सूर्यफूल १३० १६५ १७०
करडी १८० १९५ २२०
सोयाबीन १०५ ११५ १५५