- नीलेश जोशी
बुलडाणा: जिल्ह्यासह राज्यात अल्पसंख्यांक समाजामध्ये गोवर रुबेला लसीकरणासंदर्भात असलेल्या गैरसमज व अफवामुळे या समाजातील मुला-मुलीमध्ये लसीकरणाचा टक्का वर्तमानात कमी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जम्मू काश्मिर सारख्या राज्यात तब्बल ९७ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे रोग प्रतिबंधक लसीकरण निरीक्षण अधिकारी डॉ. मुजीब सय्यद यांनी दिली. दुसरीकडे गेल्या आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रातील एक कोटी ८० हजार मुला-मुलींना गोवर, रुबेला लस देण्यात आली असून महाराष्ट्रात तीन कोटी ५० लाख मुला-मुलींना ही लस देण्यात येणार आहे. दक्षिण आशियातील १३ देशातून गोवर निर्मूलन आणि रुबेला नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कंबर कसलेली असतानाच भारतात फेब्रुवारी २०१७ पासून हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यातंर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये एकट्या जम्मु काश्मिर राज्यात ९७ टक्के लसीकरण झाले असल्याचे ते म्हणाले. काश्मिर विभागातही हे लसीकरण ९७ टक्के झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात आणि राज्यात काही ठिकाणी अल्पसंख्यांक समाजामध्ये लसीकरणासंदर्भात निर्माण झालेले गैरसमज, विद्यार्थ्यांना आलेल्या रिअॅक्शन व सोशल मिडीयात आधार नसलेले फिरत असलेले संदेश पाहता मोहीमेबाबत गैरसमज निर्माण झाले होते. अल्पसंख्यांकांच्या शाळामध्ये या लसीकरणाला विरोध झाला होता. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यातही हा टक्का कमी असल्याने अल्पसंख्यांक समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी तथा ‘गोवर, रुबेला लसीकरण: गैरसमज आणि तथ्ये’ हा मुद्दा घेऊन पाच ते सात डिसेंबर दरम्यान डॉ. सय्यद यांनी मुक्काम ठोकला होता. त्यानुषंगाने लसीकरण मोहिमेसंदर्भात सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली असता त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. देशातील दक्षिणेतील राज्ये, गुजरात, हरियाणामध्ये लसीकरण पूर्ण झाले असून भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत एक तृतियांश शून्य ते १५ वर्ष वयोगटातील मुले आहेत. या मुलांना प्रामुख्यने ही लस देण्यात येत आहे. जवळपास दहा वर्षे केलेल्या अभ्यासानंतर गोवर, रुबेलाचे संक्रमण हे याच वयोगाटील मुलांच्या माध्यमातून दुसर्यामध्ये होत असल्याचे स्पष्ट झाल्याने लसीकरणासाठी हा वयोगट निवडण्यात आला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे रोग प्रतिबंधक लसीकरण निरीक्षण अधिकारी डॉ. मुजीब सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गेल्या १३ वर्षापासून जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीकरण कार्यक्रमाशी ते जुळलेले असून बांग्लादेशामध्येही त्यांनी रोहिंग्यांच्या निर्वासीत छावणीमध्येही लसीकरण केलेले आहे.
जागृती मोहिमेचा सकारात्मक परिणाम
आरोग्य विभागाने जिल्ह्यात अफवा आणि गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी मोहिम हाती घेतल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहे. मलकापूरसह चिखली व अन्य भागात अल्पसंख्यांक समाजातील मुली-मुलींना लसीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. चिखली तालुक्यातील अंबाशी येथील अल्पसंख्यांक समाजाच्या शाळेमध्येतर ९५ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती माता व बालसंगोपन विभागाचे डॉ. रविंद्र गोफणे यांनी दिली.
मराठी व उर्दू शाळेमधील मुलांना एकत्रीत लसीकरण
बुलडाणा शहरानजीकच्या देऊळघाट येथे तर जनमानसात निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी मराठी व उर्दू शाळेतील मुला-मुलींना एकत्रीत लसीकरण करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम पडत असून बुलडाणा जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजामधील मुला-मुलींमधील लसीकरणाचे अगदी शून्य ते दहा टक्क्यांवर असलेले प्रमाण आता सातत्याने वाढत असल्याची माहिती डॉ. रविंद्र गोफणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.