या घटनेत पूजा गजानन जाधव या महिलेचा मृत्यू झाला हाेता. ती पती व तीन मुलींसह जालना येथे राहत होती. मात्र ती गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा येथे माहेरी आली होती. दरम्यान, तिला घेण्यासाठी पती गजानन विश्वनाथ जाधव आला होता. ९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्याने पत्नीचा धारदार चाकूने खून केला होता. सोबतच तीन लहान मुलींसह संगम तलावात उडी घेतली होती. स्थानिकांनी त्यांना वाचविले होते. त्यानंतर आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली होती. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची त्याने हत्या केली होती, अशी चर्चा आहे. मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन जाधव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती. १० ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्यास १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती पीएसआय सुधाकर गवारगुरू यांनी दिली.
पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:40 AM