लोणार कोविड सेंटर व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगितले. वातावरणातही बदल होत असल्यामुळे श्वसनविकारांचे रुग्णही वाढत आहेत. ही वाढ चिंताजनक आहे. दिवसभरात उकाडा, ढगाळ हवामान, पाऊस असे बदल शरीरासाठी हानीकारक आहेत. ताप, सर्दी, खोकला यांमध्ये वाढ होण्यास असे वातावरण कारणीभूत ठरते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास आजाराची तीव्रता वाढण्याची भीती आहे. त्याचबरोबर मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे हात धुणे, अंतर राखणे या प्रतिबंधात्मक उपायांकडेही नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी होणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. मापारी यांनी स्पष्ट केले.
विषाणूजन्य आजारांच्या वाढीला पोषक वातावरण
एकाच दिवसात सर्व प्रकारचे हवामान हे आजारांना निमंत्रण देते. सध्या शहरात रात्रीपासून सकाळपर्यंत गारठा आहे. दिवसभर उकाडा आहे. ढगाळ हवामान आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजारांच्या वाढीला पोषक वातावरण आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोणत्याही विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जनरल फिजिशियन डॉ. राजेश मुंदडा यांनी केले आहे.
कोट.......
सार्वजनिक ठिकाणी वावरू नये. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही हे पाहावे. त्यासाठी मास्कचा वापर करावा. हात धुतले नसल्यास चेहरा, नाक, तोंड यांना स्पर्श करू नका. वैयक्तिक स्वच्छता राखण्यावर भर द्या.
डाॅ. भास्कर मापारी, कोविड सेंटर व्यवस्थापक, लोणार.