- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: देशात असलेल्या सुमारे चार हजार नद्यांप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या नद्यांसह छोट्या नद्यांचे पाणी प्रदुषीत झालेले आहे. विशेष म्हणजे १९८७ पर्यंत बारमाही वाहती असणारी पुर्णा नदीही आज खंडीत झालेली आहे.पाण्यासोबतच रेतीचा अती उपशामुळे नद्यांची स्थिती बिकट झाली असून शहरी तथा ग्रामीण भागातील सांडपाणी तथा औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया न झालेले पाणी तसेच नद्यात सोडण्यात येत असल्याने नद्यांचाही श्वास कोंडला आहे. बुलडाणा जिल्ह्यात पुर्णा, पैनगंगा, खडकपूर्णा, नळगंगा, विश्वगंगा, तोरणा, मन, मस, ज्ञानगंगा नद्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. हरित लवादाच्या निर्णयांचीही योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. घटनेच्या कलम ५१ अंतर्गत मानव हक्काची प्रत्येकाल जाण आहे. मात्र राज्यघटनेने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आज सर्वांनाच विसर पडत आहे. त्यामुळे प्राकृतीक साधनांची जपवून व संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. नद्यांचे खोलीकरण करण्यात आले त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. पण दैनंदिन पाण्याचा शहरी तथा ग्रामीण भागात होणारा वापर व त्याचे सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणीच पिण्यायोग्य राहलेले नाही. साबणासह तत्सम वस्तू दररोज वापरल्या जातात. त्यामुळे सांडपाण्यात कॉस्टीक सोड्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रदुषणामुळे नद्यांच्या पाण्याचा टिडीएसही वाढत आहे. त्यामुळे नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जनमासनापासूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नद्यांचा कोंडला श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:09 PM