साखरखेर्डा : गत दाेन महिन्यात साखरखेर्डा परिसरात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दाेन महिन्यात परिसरात ४२० नवे रुग्ण आढळून आहेत. वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण सुरू केले आहे. मात्र, साखरखेर्डा येथे लसच नसल्याचे चित्र आहे. एकीकडे लसीकरण महाेत्सव साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात येते, तर दुसरीकडे लसच उपलब्ध नसल्याने हा कुठला महाेत्सव असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित हाेत आहे.
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २३ गावे येत असून, सहा उपकेंद्र आहेत. ६० वर्षांवरील वृध्द नागरिकांची संख्या १० हजार असून, ४५ ते ६० वर्षांतील नागरिकांची संख्या २० हजारांच्या आसपास आहे. एकूण संख्या ३० हजार असताना आजपर्यंत केवळ २२५० लसीचे डोस मिळाले आहेत. त्या लसीकरणाच्या प्रतीक्षेत आज २७ हजार ७५० नागरिक असून, गेल्या आठवडाभरात एकाही नागरिकाला लसीचा डोस देण्यात आला नाही. दररोज २०० ते २५० नागरिकांना डोस देण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. शेंदुर्जन येथील उपकेंद्रातसुध्दा कोरोना तपासणी आणि लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. परंतु एका आठवड्यापासून लस उपलब्ध न झाल्याने नागरिक परत जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ एप्रिलपासून लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला होता आणि तो दिवस लस उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन केले होते. परंतु प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्रात लसच उपलब्ध न झाल्याने नागरिकांची निराशा झाली आहे.
३ हजार ३७२ जणांची काेराेना तपासणी
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात १ फेब्रवारी ते १७ एप्रिलपर्यंत ३३७२ व्यक्तींची कोरोना तपासणी केली असता त्यापैकी ४२० रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले. तसेच २९७२ निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे लसीकरण किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. कोरोना हा आजार जीवघेणा आजार रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात यावी, यासाठी राजकारण बाजूला ठेवून लस उपलब्ध कशी होईल, यासाठी प्रयत्न करावेत.
दाऊत कुरेशी
सरपंच, साखरखेर्डा