बुलडाणा : जिल्ह्यात दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तूर साेंगणी करून शेतात ठेवली आहे. पाऊस आल्यास तूर भिजण्याची शक्यता आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
सततच्या पावसामुळे खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तूर पिकाकडून शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणात आस आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीची साेंगणी करून शेतात ठेवली आहे. दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. त्यामुळे साेंगणी करून ठेवलेली तूर घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. धुक्यामुळे हरभरा पिकाची फुले गळण्याची शक्यता आहे. पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान हाेण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धाेक्यात सापडली आहेत. हरभरा पिकावर अळ्यांचे आक्रमण झाल्यास उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
काेट
दाट धुक्यामुळे हरभरा पिकाची फुले गळण्याची शक्यता आहे. पावसामुळे रब्बी पिकांना नुकसान हाेणार नाही. साेंगणी केलेल्या तुरीचे पावसामुळे नुकसान हाेऊ शकते.
- सी.पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा