- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य तापाची तीव्रता वाढली असून, टायफाईड, मलेरीया आजारांचे रुग्ण वाढले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ञांकडील ‘ओपीडी’ दीडशे पार गेली आहे. तर ‘आयपीडी’ने सुद्धा पन्नाशी गाठली आहे. विशिष्ट जातीचे आणि संसर्ग असलेले डास चावल्याने मलेरिया व डेंग्यूसारखे रुग्ण समोर येत असल्याचे दिसून येते. महिन्याभरामध्ये डेंग्यूचेही चार ते पाच बालरुग्ण आढळून आल्यामुळे बालआरोग्य धोक्यात आले आहे.पावसाची संततधार आणि त्यातच आॅक्टोबर हिटचा प्रभाव जाणवण्यास प्रारंभ झाला आहे. वातावरणातील या बदलामुळे जिल्ह्यात सध्या व्हायरल फिव्हरचा धोका निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांना विषाणूजन्य तापाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे चिखली तालुक्यातही या वर्षीचा पहिला स्क्रब टायफसचा रुग्ण आढळून आला आहे. दवाखान्यात तापाने फणफणलेल्या चिमुकल्यांची गर्दी चिंताजनक ठरत आहे. विषाणूच्या तापाची तीव्रता गेल्या आठवड्यापासून वाढली आहे. त्यासोबतच सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखी लक्षणे चिमुकल्यांमध्ये दिसून येत आहेत.
तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात?वातावरणात बदल झाल्यामुळे व सध्या पाऊस सतत सुरू असल्याने मुलांमध्ये ‘व्हायरल फिव्हर’चे प्रमाण वाढले आहे. मच्छरांचे वाढते प्रमाण व दूषीत पाणी पिण्यात आल्याने टाइफाईचे रुग्ण सध्या आहेत. पालकांनी योग्य ती काळजी घ्यावी.े. - रामलाल वैराळकर, बालरोगतज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा.
खाटांची संख्या अपूरीजिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागात २५ खाटांची संख्या आहे. परंतू सध्या ४० ते ५० रुग्ण याठिकणी येत असल्याने खाटांची संख्या अपूरी पडत आहे.
औषधांचा पुरवठावाढत्या आजारांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी औषधांचा पुरवठा वाढविण्यात आला आहे. त्यात अॅन्टीबायोटीक औषधांचीही कमतरता भासणार नाही व इतर औषधीसाठाही पूर्ण ठेवण्यात आला आहे.
आरोग्य विभागाची भूमिकाव्हायरल फिवरचे प्रमाण सध्या आहे. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. उपचारामध्ये कुठलीच हलगर्जी होणार नाही, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत.- बाळकृष्ण कांबळे,जिल्हा आरोग्य अधिकारी.