कोविड रुग्णांनी उपचार सुरू होण्यापूर्वी तसेच कोविडमधून बरे झाल्यावरही विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत जे लोक दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत, अशा रुग्णांमध्ये कोरोनाचे गंभीर लक्षणे दिसून येतात. या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपचारादरम्यान प्रभावी औषध म्हणून रेमडेसिविर तसेच उपचाराचा शेवटचा पर्याय म्हणून स्टेरॉइडचा वापर केला जातो.
या उपचारातून अनेक रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. मात्र, काही रुग्णांवर त्याचा विपरीत परिणामही झाल्याचे दिसून येत आहे. हे दुष्परिणाम प्रामुख्याने मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये, तसेच ज्या रुग्णांमध्ये स्टेरॉइडच्या वापरादरम्यान शुगर वाढल्याची समस्या उद्भवली अशाच रुग्णांमध्ये जाणवले. फंगल इन्फेक्शनचा धोका याच माध्यमातून होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा कोविडच्या गंभीर रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांना त्यांच्या विविध आजारांविषयी माहिती देणे गरजेचे आहे.
स्टेरॉइडचे साइड इफेक्ट
स्टेरॉइडच्या वापरामुळे ज्या व्यक्तीला शुगरची समस्या नाही, अशा रुग्णाचेही शुगर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहदेखील होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर तीन ते चार वेळा रुग्णाच्या शुगरचे निरीक्षण करतात. या शिवाय, स्टेरॉइडचे किडनीवर तसेच रक्तदाब, शरीरावर सूज येणे आदी लक्षणे दिसू लागतात. तसेच काळी बुरशी म्हणजेच फंगल इन्फेक्शनची समस्यादेखील उद्भवू शकते. हा आजार डोळ्यांसह नाकाचे हाड आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकतो.
रेमडेसिविरचे साइड इफेक्ट
रेमडेसिविर हे कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरले. मात्र, त्याचेही काही साइड इफेक्ट असल्याचे समोर आले आहे. रेमडेसिविर हे लिव्हर फंक्शन, किडनी आणि हृदयाचे कार्य प्रभावित करते. त्यामुळेच डॉक्टर रुग्णाला रेमडेसिविर देण्यापूर्वी रुग्णांच्या लिव्हर फंक्शनसोबतच किडनी क्रियेटिनीनचे निरीक्षण करतात. या निरीक्षणानंतरच डॉक्टर रुग्णांना रेमडेसिविर देतात. रेमडेसिविरमुळे अनेकदा रुग्णाच्या हृदयाचे ठोके कमी पडतात.
काेविडमधून बरे झालेल्या रुग्णांना आरामाची गरज असते़ काेराेना व्हायरसमुळे अनेकांना थकवा येताे़ अनेक रुग्णालयातून सुटी मिळताच नियमित कामकाज सुरू करतात़ असे केल्याने ऑक्सिजन लेव्हल कमी हाेण्याची शक्यता असते़ ज्यांना शुगर आहे, त्यांनी वेळाेवेळी निरीक्षण करावे़ शरीरामध्ये कुठलेही बदल झाल्यास तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा़ प्राेटिनयुक्त भाेजन करावे़
-डाॅ़ सचिन झडगे, एम.बी.बी.एस. डी.एन.बी. मेडिसिन
रेमडेसिविरमुळे लिव्हर फंक्शन खराब हाेऊ शकतात़ स्टेराइडमुळे वजन वाढू शकते़ त्यामुळे काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांनी काळजी घेण्याची गरज आहे़ औषधी वेळेवर घेतली पाहिजे़ काही दुखल्यास विशेषत: शरीरामध्ये काही बदल जाणवल्यास किंवा त्रास हाेत असल्यास तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा़
-डाॅ़ पंजाबराव शेजाेळ, एम.डी.