धामणगाव धाडः यावर्षी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. मशागतीकरिता बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर यंदाच्या हंगामात वाढल्याचे चित्र आहे. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी शेणखताकडे वळल्याचे चित्र आहे़
खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करण्यात यावे. बी-बियाणे व रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांपेक्षा शेणखत शेतात टाकत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळिराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला. तरीदेखील यंदा नवीन जोमाने व आशेने शेतकरी कामाला लागला आहे. पैशांची जमवाजमव करून मशागतीच्या कामाला शेतकरी लागले आहे. पेरणीकरिता बियाणे खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होताना दिसत आहेत. बी-बियाणे, खते खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
गेल्यावर्षी अवकाळी पावसाने शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. खरिपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी हाती येईल, या आशेने शेती मशागत करण्याच्या कामाला जिल्ह्यात वेग आला आहे.
मशागतीत यंत्रांचा वापर वाढला
बैलजोडीद्वारे अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात. मात्र, ज्यांच्याकडे बैल नाहीत त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागतो. शिवाय बैलजोडीने मशागत करताना अधिक वेळ लागत असल्याने ट्रॅक्टरने शेताची मशागत केली जात असल्याने नागरणी खोलवर होते. यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे. परंपरागत बैलजोडीच्या साहाय्याने मशागत न करता आधुनिक पद्धतीने म्हणजेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करताना तो दिसून येत आहे.