बुलडाणा जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले. तसेच जीवित हानीही होत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. या पावसामुळे हवेत गारवा आहे. तसेच अधूनमधून ढगाळ वातावरण राहत आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. चिखलमय रस्ते झाले आहेत. वातावरणातील बदलामुळेच लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला असे आजार होत आहेत. उप जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या १२ वर्षांपर्यंतच्या मुलांची गर्दी वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पालकांनी मुलांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही केले.
ही घ्या काळजी
ताप आल्यास त्वरित डाॅक्टरांना दाखवावे.
डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे आढळून येताच तपासणी करावी.
डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नये.
पाणी उकळून प्यावे.
ओपीडीत रोज ३० रुग्ण
उपजिल्हा रुग्णालयात सध्या सर्दी, ताप, खोकला असलेले जवळपास ३०-४० रुग्ण रोज येत आहेत. यातील गंभीर असणाऱ्यांना वॉर्डात पाठवून भरती करून घेतले जात आहे. त्यांच्यावर परिचारिकांमार्फत लक्ष ठेवले जाते. तसेच डॉक्टरांकडूनही राउंड घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या वॉर्डात २५ रुग्ण दाखल असल्याचे समजते.
डेंग्यूच्या साथीला चिकुनगुनिया
अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ वाढली आहे. सरकारीसह खासगी रुग्णालयात मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या लोकांना डेंग्यूने ग्रासल्याची उदाहरणे पाहावयास मिळत आहे, असे असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यातच आता डेंग्यूच्या साथीला चिकुनगुनियाही आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
पालकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी
सध्या रुग्णसंख्या वाढली आहे. रोज ४० पेक्षा जास्त मुले सर्दी, ताप, खोकला झाल्याने उपचारासाठी येतात. तसेच डेंग्यूचीही साथ आहे. पालकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी. थोडीही लक्षणे जाणवताच मुलांना तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांकडे दाखवावे.
- डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव.