खामगाव: तालुक्यातील घारोड येथील सन १९९० पूर्वीचे अतिक्रमण शासननिर्णयानुसार नियमानुकुल करणेबाबत तसेच तहसीलदार खामगाव यांच्याकडील दावे मंजूर करण्यासाठी घारोड येथील नागरिकांनी मंगळवारपासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले की, घारोड शिवारातील अतिक्रमण धारक शेतकर्यांनी कुटुबाच्या उदर निर्वाहासाठी जमिन वहिती केली आहे. अतिक्रमण केल्यामुळे संबंधिताना दंड सुध्दा आकारण्यात आला आहे. मात्र, तरीही प्रशासकीय स्तरावरून १४ एप्रिल १९९० पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यात आलेले नाही. तसेच त्यांचे दावे मंजूर केलेले नाहीत. दरम्यान, संबधित अतिक्रमित जागेवर जलसंधारण विभागाकडून साठवण तलावाचे काम करण्यासाठी कंत्राटदाराकडून तसेच संबंधित अधिकार्यांकडून दबाव येत असल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबिला असल्याचे नमूद केले आहे.
त्याचप्रमाणे प्रल्हाद राघो इंगोले, धोंडू भगवान इंगळे, सखाराम उदेभान इंगोले, मधुकर भगवान इंगळे, लिलाबाई सदाशिव इंगोले, रामदास गणपत इंगळे, मिराबाई भिकाजी इंगोले, पंढरी नारायण इंगोले, अजाबराव तुकाराम इंगोले, प्रकाश सदाशिव इंगोले आदी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.