बुलडाणा: स्वातंत्र्यदिनी विविध कारणांसाठी ९ जणांनी आत्मदहन तर १४ जणांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ७५ व्या स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर चांगलाच गजबजलेला राहणार असतानाच आत्मदहन करणाऱ्यांना रोखण्याचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान राहणार आहे.
आपल्या न्याय, हक्कासाठी जिल्ह्यातील पीडित, वंचित नागरिक स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, उपोषण आणि आत्मदहन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा देतात. त्याचप्रमाणे यंदाही अशाच प्रकारच्या निवेदनातून ९ जणांनी आत्मदहनाचा तर १४ जणांनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ही निवेदने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाले असून, १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजून जाणार आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांना चांगलीच तारेवरची कसरत घ्यावी लागणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस सतर्क झाले आहेत.
असा असणार पोलीस बंदोबस्त
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ आत्मदहन आणि १४ उपोषण करण्यात येणार असल्याने स्वातंत्र्यदिनी एकीकडे झेंडावंदन तर दुसरीकडे बंदोबस्त अशा दुहेरी भूमिका पोलिसांना पार पाडाव्या लागणार आहेत. यामुळे ३० ते ४० पोलीस कर्मचारी, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.