बुलढाणा: बुद्धीबळाच्या खेळात भारताचे भविष्य उज्वल आहे. बुद्धीबळामधील करिअरचा स्पेल एक मोठा स्पेल असला तरी भारताने आज बलाढ्य रशियाला मागे टाकले असून अमेरिकेनंतरचे दुसरे स्थान पटकावले आहे. भारतामध्ये आज बुद्धीबळ खेळात अनेक तरूण खेळाडू समोर आले असून भविष्यात बुद्धीबळामध्ये जागतिक शक्ती शक्तीम्हणून आपण उदयास येऊ शकतो, असे मत भारताचा ग्रँन्डमास्टर अभिजीत कुंटे याने बुलढाणा येथे व्यक्त केले. बुलढाणा येथील सहकार विद्या मंदीराच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवशीय फिडे मानांक राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमासाठी ते रविवारी बुलढाण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मेघना कुंटे, बुलढाणा अर्बनचे मुक्य व्यवस्थापकिय संचालक डॉ. सुकेश झंवर, बुद्धीबळ संघटनेचेहेमेंद्र पटेल, अंकुश रक्ताडे, प्रवीण पाटील, अमरिश जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना अभिजीत कुंटे म्हणाले की जागतिक क्रमवारीत आज पहिल्या ५० मध्ये देशातील जवळपास सात खेळाडू असून आणखी गुणवान खेळाडू रांगेत उभे आहेत. जागतिकस्तरावर आज भारताचे बुद्धीबळाच्या खेळामध्ये २० टक्के योगदान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वर्तमान काळात आता खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळत असल्या तरी प्रत्यक्षात गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रशिक्षकाची गरज असते. आमच्या काळात तेवढी सुविधा नव्हीत. परंतू आज प्रशिक्षण उपलब्ध आहेत. त्यामुळेच की काय देशात ८४ ग्रँन्डमास्टर आहेत. यातील ३० ग्रॅन्डमास्टर हे देशाची या खेळातील ताकद असलेल्या तामिळनाडूतील असल्याचे ते म्हणाले.
एशियन गेम्समध्येही बुद्धीबळआगामी काळात होणाऱ्या एशियन गेम्समध्ये बुद्धीबळ खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. लवकरच एशियन गेम्ससाठी निवड चाचणी होणार असून विधीत गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्याकडून महाराष्ट्राला नक्कीच अपेक्षा असतील, असे ते म्हणाले.
बुलढाण्यातूनही ग्रँन्डमास्टर व्हावा
सहकार विद्या मंदिरातील स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन पहाता या भागातूनही एखादा ग्रँन्डमास्टर आपल्याला मिळू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र या खेळात बलवान आहे. ते पहाता बुलढाण्यातूनही गुणवान खेळाडू व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चेन्नईतील स्पर्धेतून प्रेरणा- झंवर
मधल्या काळात युक्रेन-रशिया युद्धामुळे तेथे होणारी स्पर्धा ही भारताला मिळाली. चेन्नईत तिचे यशस्वी आयोजनही झाले. या स्पर्धेमुळेत बुलढाण्यात राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे बुलढाणा अर्बनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी यावेळी सांगितले.