जलंब ता. शेगाव : शेगाव नगरपरिषदेच्या जलकुंभावरून टँकरद्वारे सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने गावात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. गावातील पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना न केल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सरपंचासह गावकºयांनी दिला आहे. जलंब येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेगाव येथील जलकुंभावरून पाणी पुरविण्यात येत होते. त्यामुळे काही प्रमाणात गावातील पाणीप्रश्न सुटला होता. मात्र २३ फेब्रुवारीपासून हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गावात सध्या कुठलाही नैसर्गीक स्त्रोत नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेगाव नगर परिषदेत विचारणा केली असता संबधित अधिकाºयांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची नगर परिषद प्रशासनाने अवहेलना केली आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १२ हजार एवढी आहे. पाणी नसल्याने प्रशासनाबाबत गावकºयांमध्ये प्रचंड जनक्षोभ वाढला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एखादेवेळी निर्माण होण्याचा धोका आहे. नागरिकांकडे कुठलाही पर्याय नसल्याने तहसिल कार्यालयासमोर १२ मार्चपासून आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सरपंच संतोष पळसकार, माजी सरपंच बबलू देशमुख, उपसरपंच उमाताई देशमुख, संजय गव्हांदे, प्रकाश देवचे, अर्चना अवचार, जयश्री घोपे, निर्मलाताई तायडे, शितल मोरे, संजय अवचार, विलास गव्हांदे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.