मोताळा (बुलडाणा): येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार प्रशिक्षक विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर २३ डिसेंबर रोजी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कुकडे यांनी संस्थेच्या कारभाराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान कुकडे यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल तयार केला व हा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात दोनशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत असून, मागील काही महिन्यांपासून कर्मचारी, प्रशिक्षक यांच्या मनमानी कारभाराला प्रशिक्षक विद्यार्थी कंटाळले होते. काही महिन्यांपासून नियमित शिक्षकांची अपुरी संख्या, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, प्राचार्यांची अनियमितता, संगणक ऑपरेटरची बदली, साफसफाईकडे कमालीचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली गेली. त्यात ग्रंथालय कक्षासह कुलूप बंद वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसण्याची वेळ आली, त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संस्थेतील कर्मचार्यांचा कारभार चव्हाट्यावर आणत २२ डिसेंबर रोजी संस्थेमध्ये गोंधळ घातला होता. या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कुकडे यांनी २३ डिसेंबर रोजी संस्थेची पाहणी केली. यावेळी मागील १0 दिवसांपासून सील असलेला कोपा रूमचे सील तोडून वर्ग उघडण्यात आला. साफसफाई कर्मचारी व शिक्षकांची रिक्त पदांची माहिती घेऊन संस्थेचा परिसर साफ करून घेतला. पाहणी दरम्यान संस्थेचे प्राचार्य रजेवर असल्याचे आढळले. दरम्यान, पाहणीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करणार असल्याचे कुकडे यांनी सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची झाडाझडती
By admin | Published: December 24, 2014 12:16 AM