स्वस्त धान्य दुकानदारांचा मृत्यूनंतर प्राधिकार पत्र (परवाना) वारसाच्या नावाने करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कुटुंब दु:खात असताना कार्यालयाचे खेटे घ्यावे लागतात. या सर्व अडचणींवर मात करून काही सोयीस्कर मार्ग काढावा आणि परवानाधारकांच्या प्राधिकार पत्रांवर वारसाच्या नोंदीचे शिबिर आयोजित करावे, अशी विनंती चिखली तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजीव जावळे पाटील यांनी केली होती. यास सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार डॉ.येळे यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये वारस नोंदी करण्यास उत्सुक असलेल्या दुकानदारांना आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती देऊन त्यांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम अव्वल कारकून शेखर सुरडकर आणि पुरवठा निरीक्षक सुनील झाल्टे यांनी केले. तयार झालेले सर्व प्रस्ताव छाननीसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाला पाठवून त्याची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर वारसाच्या नोंदीसह तयार असलेले प्राधिकार पत्र २३ सप्टेंबर रोजी परवानाधारक आणि त्यांच्या वारसांना सुपुर्द करण्यात आले. यासाठी जिल्हापुरवठा कार्यालयाचे कर्मचारी विष्णू आंभोरे यांनी विशेष मेहनत घेतल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बेल्लाळे यांनी दिली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू आंबुस्कर, जिल्हा सचिव मोहन जाधव यांची भाषणे झाली. प्रास्ताविक राजीव जावळे यांनी केले. आभार भारत म्हस्के यांनी मानले. याप्रसंगी जिल्हा पुरवठा विभागाचे सहा.लेखा अधिकारी खंडाळे, नितीन इंगळे, नितेश मगर, रूपेश सोनवाल आदी कर्मचारी तसेच तालुक्यातील रास्त भाव दुकानदार व त्यांचे वारस उपस्थित होते.
राज्यासाठी आदर्शदायी उपक्रम
चिखलीत राबविल्या गेलेल्या अनेक उपक्रमांची दखल राज्यपातळीवर घेतल्या गेली आहे. त्यात स्वस्त धान्य दुकानदारांच्या वारसाच्या नोंदी घेण्याच्या शिबिराचीदेखील भर पडली आहे. अशा प्रकारचे शिबिर हे महाराष्ट्र राज्यात प्रथमच होत आहे. चिखली तालुक्याने घेतलेल्या या शिबिराचा आदर्श राज्यभर घेतला जाईल, असा विश्वास तहसीलदार डॉ.येळे यांनी यावेळी व्यक्त केला.