धामणगाव बढे : परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग वाढत असून शासकीय कार्यालयांमध्ये शिरकाव झाल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे़ माेताळा तालुका कृषी कार्यालयातील सहा अधिकारी आणि कर्मचारी पाॅझिटिव्ह आले आहेत़ या कार्यालयात येणाऱ्यांना काेराेना चाचणी शिवाय प्रवेश देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रभाव बघता शासकीय कार्यालये सुद्धा आता यापासून अलिप्त राहिली नाही.
१५ एप्रिल रोजी मोताळा तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या कोरोना चाचणी मध्ये दहापैकी सहा अधिकारी व कर्मचारी कोरणा पॉझिटिव्ह निघाले.
त्यामध्ये २ मंडळ कृषी अधिकारी ,एक पर्यवेक्षक, दोन लिपिक व एक शिपाई यांचा समावेश आहे.
कृषी कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेल्या तीन कृषी केंद्र धारकांना तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी प्रथम कोरोना चाचणी करून येण्यास सांगितले .त्या तीन पैकी एक जण कोरोना संक्रमित निघाला. तत्पूर्वी कासार यांनी स्वतःची पण कोरोना चाचणी करून घेतली. त्यामुळे कृषी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांची कोरोना चाचणी आता सक्तीची केली जाणार आहे .मागील एक वर्षापासून कृषी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजन पातळी तपासण्याचा उपक्रम तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी राबविला आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी कोरोना चाचणीचा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शेतकरी बांधवांसह कृषी कर्मचाऱ्यांनी याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी केले आहे.