खामगाव (बुलडाणा) : पावसाळा सुरू होताच अनेक आजारांचा प्रकोप दिसून येतो. साधारणत: जुलै-ऑगस्ट महिन्यात स्क्रब टासफसचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता असतानाच खामगाव, शेगाव, जळगाव जामोद तालुक्यात रुग्ण आढळून आल्याची नोंद झाली आहे. या तीन तालुक्यांतील नऊ रुग्णांपैकी ८ खासगी रुग्णालये तर एकाची नोंद खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात झाली आहे. ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या विशेषता गाजरगवतावर आढळणाऱ्या किड्याने चावा घेतल्याने या रोगाचा प्रसार होत आहे.
स्क्रब टायफस हा 'ऑरियंटा सुटसुगामुशी' या जीवाणूपासून होणारा आजार आहे. ट्रॉम्बिक्युलिड माइट्सचे लारव्हा ज्याला चिगर माइट्स म्हणतात, ते चावल्यामुळे हा आजार होतो. या आजाराचे कीटक गवत, शेत, जंगल, लॉन, तलाव, झरे अशा भागांत आढळतात. हे कीटक लाल, शेंदरी पिवळ्या रंगाचे असतात. पूर्ण वाढ झालेले कीटक चावा घेत नाहीत.
लारव्हा स्वरूपात असलेले कीटकच चावा घेतात. शेतात काम करणारे व जंगलात काम करणारे मजूर, गावाच्या टोकाला राहणारे लोक, अर्ध्या बाह्याचे किंवा तोकडे कपडे घालणारे व्यक्ती, हातमोजे न घालता कामे करणारे मजूर व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते.
- या गावात आढळले रुग्णखामगाव शहर-१, तालुक्यातील जयपूर लांडे-२, वर्णा-१, निपाणा-१, घाटपुरी-१, पेंडका पातोंडा-१. शेगाव तालुका-२, जळगाव जामोद -१ अशी रुग्णसंख्या आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- हा आहे यावर उपायसंपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालावे. घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत, झाडे झुडपे नष्ट करावी. घरातील उंदीर व इतर प्राण्यांपासून दूर राहावे. घरातील साफसफाईवर विशेष लक्ष द्यावे. आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवावे.
- आजाराची लक्षणेतीव्र ताप येणे, डोकेदुखी, संधे दुखी, थंडी वाजणे, मळमळ होणे, सुस्ती चढणे, शरीरात कंपण सुटणे, कोरडा खोकला, न्यूमोनियासदृश आजार, अंगावर चट्टे येणे, खाज सुटणे, जखम होऊन खिपल पकडणे आदी लक्षणे या आजाराची आहे.
ग्रामपंयातींना तणनाशक तसेच कीटकनाशकाची फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी आरोग्य विभागाने सुचविलेल्या उपायांचे पालन करावे, घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. अभिलाष खंडारे, तालुका आरोग्य अधिकारी, खामगाव