महागाई कळस गाठत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या दरवाढीसोबतच आता खतांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. खरीप पेरणी तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. डीएपीसारख्या खताच्या दरात प्रति बॅग पाच-दहा रुपये नव्हे, तर २०० ते २५० रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात डीएपीच्या एका बॅगसाठी १ हजार २५५ रुपये मोजलेल्या शेतकऱ्यांना आता १ हजार ५०० रुपये लागणार आहेत. कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा जास्तीच्या आर्थिक संकटात लोटला गेला आहे. सुरुवातीला केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर खताची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे साडेसहाशे ते सातशे रुपयांना मिळणारी खताची बॅग बाराशे रुपयांना खरेदी करावी लागली. परंतु आजवर शेतकऱ्यांच्या खात्यावर सबसिडी जमा होताना दिसत नाही. हा आर्थिक बोजा शेतकरी कसाबसा वाहून नेत असताना शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
इंधन दरवाढीचा परिणाम
इंधन दरवाढीचा परिणाम शेतकऱ्यांवर चांगलाच झाला आहे. आता शेतातील अनेक कामे हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल महागल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची कामेही परवडत नसल्याचे दिसून येते.
मशागतही महागली
रब्बी हंगामातील कामे आटोपल्यानंतर शेती मशागतीची कामे सुरू होतात. खरीप हंगामातील पेरणीकरिता शेतीची पेरणी पूर्व मशागत करण्यात येते. एप्रिलपासून मशागतीची कामे सुरू होतात. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरण पाळी, रोटाव्हेटर, शेतात शेणखत टाकणे, यासारखे अनेक मशागतीची कामे ट्रॅक्टरने केली जातात. परंतु, ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेलचे दर वाढल्याने शेती मशागतही महागली आहे.
लाखोंचा खर्च करून पिकविलेला शेतीमाल लॉकडाऊनच्या काळात बांधावर टाकून देण्याची वेळ ओढावली होती. यातून शेतकरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच महागाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. खरीप पेरणी आणखी काही महिने दूर असतानाच खताच्या दरामध्ये मोठी वाढ केल्याने शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.
अविनाश वानखडे, शेतकरी.
शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. मजूर मिळत नसल्याने पेरणी, नांगरणीसारख्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहे. मळणीसाठीही ट्रॅक्टर, हार्वेस्टर उपयोगात आणले जात आहे. पेट्रोल, डिझेल वाढल्यामुळे मशागतीची ही कामे महागली आहेत. असे असतानाच आता खताचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत.
लक्ष्मण पवार, शेतकरी.
खत दर आधीचे दर
डीएपी १२५५ १५००
१०-२६-२६ १२२५ १४००
१२-३२-१६ १२३५ १४१०
२४-२४-० १३३० १५००