जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी अधीनस्त कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी व पंचायत विभागाअंतर्गत ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांच्या माध्यमातून केले जाते. स्वच्छता सर्वेक्षणामध्ये दरवर्षी शासन निर्णयाप्रमाणे सर्वेक्षण न केल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्ती तसेच कार्डमध्ये दिलेल्या त्रुटीची पूर्तता करणे अपेक्षित असताना लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होऊन साथ रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे हे सर्वेक्षण योग्य पद्धतीने आणि गांभीर्याने राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या आहेत.
साथरोगाचा उद्रेक टाळण्यासाठी उपाययोजना
प्रत्येक ग्रामपंचायतीने तीन महिने पुरेल इतका ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध ठेवणे, गट ग्रामपंचायत असल्यास संबंधित ग्रामपंचायतीने वाडी - वस्तीवरसुद्धा ब्लिचिंग पावडर साठा उपलब्ध ठेवणे, नवीन बॅग असल्यास त्वरित नमुना प्रयोगशाळेत तपासणी करता पाठवणे, ग्रामपंचायत व वाडी वस्तीवरील सर्व पिण्याच्या पाण्याचे सर्व नमुने जैविक तपासणीकरिता पाठविणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.