लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मनुष्याच्या शेवटचे जागा म्हणून ओळख असलेल्या स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी गत काही वर्षांपासून खामगावातील ओंकारेश्वर श्रमदान ग्रुपचा पुढाकार आहे. श्रमदानातून स्मशानभूमीला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा संकल्प घेतलेल्या हातांच्या मदतीला आता शहरातील विविध समाजबांधव धाऊन येत आहेत. श्रमदानाला सामाजिक समरसतेची जोड मिळत असल्याने, ओंकारेश्वर स्मशानभूमीत स्वर्ग अवतरल्याचा प्रत्यय आता खामगाववासियांना येत आहे.येथील चिखली रोडवर ओंकारश्वर नावाची पुरातन स्मशानभूमी आहे.
गत काही वर्षांपूर्वी या स्मशानभूमीची अंत्यत दयनिय अवस्था होती. स्मशानभूमीत गवत वाढले होते. मात्र, गत दीड वर्षभरात श्रमदानातून या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात येत आहे. ओंकारेश्वर श्रमदान ग्रुपच्या पुढाकारातून या स्मशानभूमीच्या श्रमदान यज्ञात विविध समाजाचे प्रतिष्ठीत आणि मान्यवर श्रमदानात सहभागी होत आहे. अठरापगड जातीतील सर्वच घटकांना या श्रमदान यज्ञात सामावून घेत, स्मशानभूमीचे पर्यटनस्थळात रुपांतर करण्यात येत आहे. सामाजिक समरसतेनंतर बच्चे कंपनीचाही सहभाग या यज्ञात घेतल्या जाणार असल्याचा मनोदय ओंकारश्वर श्रमदान ग्रुपचे राजेश मुळीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
श्रमदानासाठी समाजबांधवांना पत्र!
- स्मशानभूमीचा कायापालट करण्यासाठी ओंकारेश्वर श्रमदान ग्रुपच्या माध्यमातून दर रविवारी श्रमदान केले जाते. या श्रमदान यज्ञात सहभागी होण्यासाठी समाजनिहाय पत्र देण्यात येते. विविध जातीतून श्रमदानासाठी येणाºयांचा ग्रुपच्या माध्यमातून सत्कार करण्यात येतो. सामाजिक समरसता दृष्टीपथात ठेवत सर्वच समाज घटकांतून येथे सेवा घेतली जात आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून स्मशानभूमीच्या स्वच्छतेचा वसा
नगर पालिकेत जन्म मृत्यू विभागात विभाग प्रमुख काम करून एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्मशानभूमीच्या स्वच्छतेचा वसा घेतला आहे. यातून आनंद मिळतो. स्मशानभूमीचा कायापालट करण्यासाठी ओंकारेश्वर श्रमदान ग्रुपसोबतच विविध समाजातील बांधवांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे. - राजेश मुळीक - ओंकारेश्वर श्रमदान गु्रप, खामगाव.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"