लोणार : अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील म्हाड, पोलादपूर, कोल्हापूर, चिपळूण व इतर पूरग्रस्त शहरांतील लाेकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी जमियते उलमाए हिंद शाखा लोणारच्या वतीने पुढाकार घेऊन ३० जुलै राेजी ५० हजार ३१८ रुपयांची वर्गणी करून मदतीचा एक हात पुढे केला आहे.
शुक्रवारच्या विशेष नमाजअगोदर लोणारच्या सर्व मशिदींमध्ये या एकाच विषयावर सर्व मौलानांनी तकरीर करून लोकांपर्यंत पूरग्रस्तांच्या वेदना पोहोचविल्या. धर्म कोणताही असो, यामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म हा मानवतेचा आहे व ईश्वराने मानवाला एकमेकांच्या मदतीसाठी पवित्र कुरआनमध्ये विशेष आदेश दिलेला आहे, याची जाणीव करून दिली. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीची आठवण यावेळी करून देण्यात आली. सर्व लोकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला व लोणारच्या सर्व मशिदींमधून एकूण ३५ हजार ५६८ रुपयांचा निधी जमा झाला. नमाजानंतर दुपारी ‘पूरग्रस्तांसाठी मदत रॅली’ या नावाखाली एका रॅलीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे प्रत्येक घर, मोहल्ला, चौक, मंदिर, मशीद, व्यापार मार्केट, दुकानदार व कार्यालयामध्ये जाऊन मदतनिधी मागण्यात आला. सर्वांनी आपापल्या सोयीनुसार या लॉकडाऊनमध्येसुद्धा मदत केली. यामध्ये पाच रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंतची मदत सर्व हिंदू- मुस्लिम समाजबांधवांनी केली. एकूण १४ हजार ७५० रुपये या रॅलीच्या माध्यमातून जमा करण्यात आले.
मशीद व रॅलीमधून जमा करण्यात आलेली एकूण रक्कम ५०,३१८/- पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आली.
राज्यभरात काढणार मदत फेरी
महाराष्ट्रभर हा उपक्रम जमियते उलमाए हिंदच्या वतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक गाव, तालुक्यातून लाखो रुपयांची मदत गरजू लोकांच्या जीवनावश्यक वस्तू व त्यांचे जीवन सुरळीत करण्याकरिता पाठविण्यात येत आहे. प्रत्यक्ष रिलीफ कॅम्प लावून त्यांची मदत करण्यात येत आहे. त्यांना तातडीने खाण्यापिण्याचे साहित्य, आरोग्यविषयक सोयी-सुविधा ‘रिलीफ कॅम्प’ लावून मदत पोहोचविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व लोकांनी पूरप्रभावित लोकांची मदत करण्याकरिता मदत करण्याचे आवाहन जमियत उलमाए हिंद लोणार शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.