- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगांव : वन जैव विविधतेचे संरक्षण करणे आणि लोकांना त्याच्या औषधी फायद्यासह शिक्षित करणे या मुख्य उद्देशातून रविवारी जळगाव जा. तालुक्यातील सालई बन येथे वनाई रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. या उत्सवाला वन्य प्रेमींसह मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. महोत्सवातील ४० पेक्षा अधिक विविध रानभाज्यांची चवींची भुरळ अनेकांना पडली. तरुणाई फाउंडेशनच्या वतीने पहिलाच रविवारी आयोजित झाला. या महोत्सवात तरुणाई च्या मातृशक्तीने ४० पेक्षा रानभाज्यांची मेजवानी दिली. आबाल वृद्धांसह चवीची गोडी असलेल्यासाठी हा महोत्सव आगळी वेगळी पर्वणी ठरला. सुरुवातीला या महोत्सवाचे सकाळी ११ वाजता जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी खामगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिपक पटेल, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी स्मिता राजहंस, तालुका कृषी अधिकारी वाकोडे, अपर्णाताई संजय कुटे, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे, डॉ. अजित जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गुणकारी औषधी भाज्यांची मेजवानी ! सालईबनातील पहिल्याच रानभाजी महोत्सवात रविवारी अनेकांनी ४५ ते ४५ रान भाज्यांचा स्वाद चाखला. कंदमुळं, पर्ण, पुष्प, खोड, डिंक, चिक आणि बिया, टरफलं यापासुन औषधी गुण असलेल्या भाज्यांची मेजवानी या महोत्सवात अनेकांनी चाखली.
रानभाज्यांची यांनी केली जपणूक शीतल किशोर पडोळ, साधना तेजराव पाचरने, सुचिता श्याम उमाळे यांच्या सह तरुणाई परिवारातील मातृशक्ती सालईबन परिसरातील आदिवासी महिलांच्या मदतीने रानभाज्यांची जपणूक करीत आहेत.
जेनेटिकली मॉडिफाइड व संकरित बियाणी व विकसित वाणांच्या गर्दीत आपण आपलं हे धन व मूळ स्वरूप हरवू नये, तसेच रानमेव्याला लोकप्रियता, राजमान्यता व प्रचार - प्रसार करण्यासाठी तरुणाई फाउंडेशन कडून हा उपक्रम राबविण्यात आला . - शीतल पडोळ, रानभाजी अभ्यासक, खामगाव