लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: शासनाच्यावतीने जलयुक्त शिवारांतर्गत तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट बंधारे, माती नाला बांध आदी कामे करण्यात आली आहेत; परंतु ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार तसेच शेतकऱ्यांचाही अपेक्षाभंग झाल्या असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेना केला असून, या निकृष्ट कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार व दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच या कामांची देयके रोखण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे केली आहे.तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्यावतीने ग्रामीण भागात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचन क्षमता वाढावी तसेच पाणीटंचाई व दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी सिमेंट नाला बांध, माती नाला बांध आदी विविध कामे करण्यात आली आहेत. याच अंतर्गत अंत्री खेडेकर, मेरा बु. येथे सिमेंट बंधाऱ्याची कामे करण्यात आली आहे. ही बंधारे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, यांच्या निर्मितीसाठी अत्यंत हीन दर्जाचे सिमेंट वापरण्यात येत आहे. तर सदर काम निकृष्ट होत असल्याने काही शेतकऱ्यांनी एकत्र येत काम बंद पाडले होत व ठेकेदाराने काम निकृष्ट असल्याची कबुलीही दिली होती. तर ते काम उत्कृष्ट दर्जाचे करावे अशी ओरड होत असूनसुद्धा संबंधित ठेकेदार व अधिकारी शासनाची लूट करून एकप्रकारे शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करीत आहेत. तर तालुक्यातील गोद्री येथेसुद्धा जुन्याच सिमेंट बंधाऱ्याची खोली करण्यात आली असून, इस्टिमेटनुसार काम न झाल्याने शेतकऱ्यांना याचा काही एक फायदा होणार होणार नाही तसेच एकाच पावसात या बंधाऱ्याचे तीनतेरा वाजू शकतात, अशी शंका नाकरता येत नाही. शिवाय या कामांमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून, जिल्हातील तसेच चिखली तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या सिमेंट बंधारा कामांची चौकशी करावी, संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करावी तसेच ठेकेदारांची देयके रोखण्यात यावीत, अशी मागणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर यांनी जिल्हाकृषी अधीक्षक लहाळे यांच्याकडे केली असून, आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी राणा चंदन, ज्ञानेश्वर टाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करा!
By admin | Published: June 26, 2017 10:17 AM