मेहकर: मेहकरचे नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत चौकशी करण्यास परवानगीचे पत्र नगर विकास विभागाने महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिले आहे.
नगर विकास विभागाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिलेल्या पत्रात म्हटले की, आपल्या विभागाच्या २८ मे २०१९च्या पत्रानुसार नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये अहमदशाह सबदरशाह यांच्या तक्रार अर्जातील तक्रार मुद्यांची चौकशी करण्यास परवानगी देण्यात येत आहे. या पत्राच्या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मेहकर शहरातील बहुचर्चीत राजीव गांधी कॉम्प्लेक्स, नगराध्यक्ष कासम गवळी यांनी निवडणूक आयोगाकडे संपत्तीबाबत सादर केलेले प्रतिज्ञापत्र व प्रत्यक्ष मालमत्ता याबाबत चौकशी होणार असल्याचे समजते. यामुळे मेहकरचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार असून चौकशी कशी व काय कारवाई करून बाहेर पडते. याकडे मेहकरवासीयांचे लक्ष लागले आहे.