- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : ‘सर्वजन मिळून टीबी संपवुया’ हे ब्रीद घेवून महाराष्ट्रात तीन टप्प्यात क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात विदर्भात १८ ते ३० जून पर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत घरोघरी क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. अत्यंत दुर्धर समजला जाणारा क्षयरोग आता बहुधा पूर्ण बरा होणारा आजार झाला आहे. महाराष्ट्र क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उप्रकम हाती घेण्यात येतात. राज्यात तीन टप्प्यात प्रत्यक्ष क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. संपुर्ण विदर्भात १८ जून पासून ही मोहीम सुरू होणार आहे. इतर जिल्ह्यातील मोहीम २९ मे ते ९ जूनपर्यंत राबविण्यात आली. विदर्भात क्षयरुग्ण शोध मोहीम ३० जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत जोखमीच्या गावामध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेवीका लिंक वर्कर, नर्सींग स्कुलचे विद्यार्थी, अंगणवाडी सेवीका घरोघरी भेटी देऊन संशयीत क्षयरुग्णाची तपासणी करणार आहेत. दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यापेक्षा जास्त मुदतीचा ताप, मागील तीन महिण्यात वजनामध्ये लक्षणीय घट, मागील सहा महिण्याच्या कालावधीत थुंकीवाटे रक्त पडणे, मागील एक महिण्यापासून छातीत दुखणे अशा रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी सहा महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेक रुग्ण उपचार मधेच बंद करतात. त्यामुळे क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. घरोघरी क्षयरुग्णांचा शोध घेतल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे.
दोन महिन्याचे निदान आता दोन तासात
क्षयरोगाच्या उपचाराला दाद न देणारो एम.डी.आर. पूर्वी नागपूर येथील प्रयोगशाळेतच पाठवावा लागत होता. त्यामुळे दोन महिन्यानंतर निदान लागायचे; मात्र आता सिबीनॅट मशीन जिल्ह्याच्या ठिकाणी आल्या आहेत. या सिबीनॅट आॅनलाईन यंत्राच्या सहाय्याने केवळ दोन तासातच एम.डी.आर.बाबात रिपोर्ट उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
तपासणीसाठी लोकसंख्येच्या १० टक्के भाग
क्षयरुग्ण शोध मोहीमेंतर्गत लोकसंख्येच्या १० टक्के भाग या टप्प्यात तपासणीसाठी घेण्यात आला आहे. त्यामध्ये झोपडपट्टी, कुपोषित बालके, कैदी, एच.आय.व्ही.बाधीत व्यक्ती, पोहचण्यास अवघड भाग याठिकाणी प्राधान्याने ही मोहीम राबवून क्षयरुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. .